डॉ.राजकर यांच्या मंतरधून – बाईपण लेखनातून माणसाच्या मुळांचा शोध

कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथावर वाईत परिसंवाद

डॉ.पंडित टापरे, डॉ. विजय चोरमारे, डॉ दत्ता घोलप आणि अजय कांडर यांचा सहभाग

प्रभा प्रकाशन कणकवलीने प्रकाशित केलेले डॉ.योगिता राजकर यांचे लेखन हे माणसांच्या मुळांचा शोध घेणारे लेखन आहे. त्यामुळे डॉ. राजकर यांच्या एकूणच लेखनाला मराठी साहित्यात चांगलं भवितव्य आहे. प्रभा प्रकाशनाने या लेखनाची उत्तम ग्रंथ निर्मिती केली असून हे लेखन महाराष्ट्रभर पोहचेल आणि या लेखनाला स्वतंत्र वाचक लाभेल असा विश्वास डॉ. योगिता राजकर लिखित मंतरधून ललित लेख संग्रह आणि बाईपण काव्यसंग्रह यावर आयोजित केलेल्या परिसंवादा मध्ये सहभागी मान्यवरांनी व्यक्त केला.
वाई येथे टिळक वाचनालयाच्या सभागृहात मंतरधून ललित लेख संग्रह आणि बाईपण दीर्घ काव्यसंग्रह या दोन ग्रंथांवर कवी आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.पंडित टापरे, डॉ.दत्ता घोलप, नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर सहभागी झाले होते. यावेळी मंचावर वाई गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, लेखिका योगिता राजकर आदी उपस्थित होते.
डॉ. चोरमारे म्हणाले, राजकर या लेखनाचा स्वतःचा आवाज सापडलेल्या लेखिका आहेत.
बंडखोरीचा आवाज लेखनात आल्या शिवाय लेखन पोहचत नाही.भोवताल समजून घेणे ही राजकर यांना लेखनाची गरज वाटते.
डॉ. टापरे म्हणाले, ललित लेखनातील लक्षणीय लेखन असे ‘मंतरधून’ चे वर्णन करता येईल.
मंतरधून शीर्षक अन्वर्थक आहे. ‘मंतरधून’ या शीर्षक अर्थाची प्रचिती या लेखनाच्या पानोपानी येते.या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक वाचक यांच्यात नितळ संवाद आहे. लखिकेची भाषा काव्यमय आणि प्रवाह गुणांने युक्त असल्याने या लेखनाशी वाचकाचा नितळ, सहज संवाद होतो. कोणतीही कलाकृती जेव्हा तात्विक पातळीवर जाते तेव्हा ती श्रेष्ठतेकडे झुकते.हे श्रेय या पुस्तकाला द्यायला हवे.
डॉ.घोलप म्हणाले ‘मंतरधून’ हे खरंतर स्त्री जगण्याचे हृदगत अनुभव आहेत. आपला भोवताल कसा न्याहाळायचा त्याचा दृष्टीनियंत्रणबिंदू कसा असावा याचा चांगला वस्तूपाठ याच्यात आहे. कारण मी आणि माझा भोवताल, त्याला लगडून येणाऱ्या अनेक बाबी , स्थळकाळाच्या अनेक मिती यामध्ये आहेत आणि प्रामुख्याने निसर्ग अनेक कंगोऱ्याने राजकरांनी शोधक नजरेनं तपासला आहे. संदर्भसंपृक्तता यामधील लेखांमध्ये आहे.तसेच हे लेखन आस्वाद्य आहे. कवी कांडर म्हणाले, बाईपण या दीर्घ कवितेत आत्मवंचना दिसत असली तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्धचा सूर टिपेला गेलेला कुठे दिसत नाही. त्यामुळे ही कविता अधिक वाचनीय झालेली आहे.साध्या सोप्या भाषेतत लिहिली गेलेली ‘बाईपण ‘ ही कविता बाईच्या रोजच्या जगण्यातले छोटे छोटे प्रश्न,छोटे-छोटे संघर्ष, बाईचं नाकारलं गेलेलं अस्तित्व आणि त्यात तिचा झालेला कोंडमारा याविषयी भाष्य करते. या अर्थाने ही कविता सर्व स्तरातील बाईच्या वेदनेला जाहीर प्रदर्शित करू पाहते. हेच या कवितेचे सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण आहे.
यावेळी विजयकुमार परीट, डॉ योगिता राजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री माने यांनी आभार मानले. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!