राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी (श. प. )चे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर भाजपवासी
उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी श.प. गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.
सावंतवाडी तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह प्रिया गावडे, मानसी निवजेकर, संतोष आसयेकर, भालचंद्र सावंत, प्रशांत मेस्त्री, महेश गवंडे कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
नामदार नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे. सर्व समाजघटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहे. आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो यामुळेच आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहोत, असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी तालुका आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत जाधव, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, मळगावचे माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.