भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ

सोमवारी १० मार्च रोजी पायाभरणी आणि कोनशिला समारंभाचे आयोजन

तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार असून भव्य दिव्य असे रामेश्वराचे मंदिर बांधकाम होणार आहे. मंदिर पुनर्बांधणीचा पायाभरणी आणि कोनशिला समारंभ सोमवारी १० मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शोभायात्रेने सुरू होणार आहे.
भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर बांधकाम हाती घेण्यात आले आहे. नवी मंदिर दुमजली असून १३ हजार स्क्वेअर फुट बांधकाम असणार आहे. मंदिराचे गर्भगृह हे संपूर्ण दगडी बांधकामाचे असेल आरसीसी कंट्रक्शन मध्ये मंदिराचा सभामंडप तर ७२ फूट उंच कळस उभारला जाणार आहे. कोकणातील २१ व्या शतकातील भव्य असे रामेश्वराचे मंदिर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उभे राहत आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी रुपये निधी उभारला जाणार आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या देणगीतून आणि दानशूर व्यक्तींच्या दानातून हे मंदिर उभे राहत आहे. या मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम १० मार्च रोजी शोभायात्रेने सुरू होत आहे.
लिंगेश्वर मंदिरामध्ये अभिषेक त्यानंतर श्री गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. लेझीम पथक, ढोल पथक, वारकरी दिंडी हरिनामाचा जागर करत ओम नमः शिवाय श्री देव रामेश्वराचा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा करून सौभाग्यवती महिला कलश घेऊन या शोभायात्रेतून रामेश्वर मंदिरापर्यंत पायी चालत अभिषेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत शोभायात्रा त्यानंतर रामेश्वराच्या पिंडीवरील जलाभिषेकासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील गंगा -यमुना -सरस्वतीचे पवित्र जल, नर्मदा परिक्रमेचे पवित्र जल आणि गोदावरी त्र्यंबकेश्वर येथील पवित्र जलाने श्री देव रामेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिर पायाभरणी आणि कोनशिला स्थापित करून मंदिराचा पाया रचला जाणार आहे. अशा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन देवालये संचालक मंडळ आणि भिरवंडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!