विविध प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची विभागीय कार्यशाळेबाहेर निदर्शने

वारंवार मागणी करूनही मागण्या मान्य होत नसल्याबद्दल केली व्यक्त नाराजी
कर्मचाऱ्यांनींं हातात झेंडे घेत घोषणाबाजी करत व्यक्त केला रोष
रा.प. प्रशासनाकडे निरनिराळी प्रलंबित असलेली थकबाकी रा.प. कामगारांना देण्याबाबत वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्यामुळे याबाबत कामगारांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. सदरची नाराजी दूर करण्यासाठी व कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी १.४.२०२० ते दि.३१.३.२०२४ या कालावधीची देय होणारी थकबाकी त्वरीत देण्यात यावी, सन २०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला असूनही सदरची थकबाकी अद्याप कामगारांना मिळालेली नाही. तसेच सन २०१६-२०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहिर केलेली वेतनवाढ कामगारांना लागू करताना घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४, २१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी केलेला होता. नोव्हेंबर २०२१ पासून सदरचा वाढीव दर कामगारांना लागू केलेला असून माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी रा.प. प्रशासनाकडे प्रलंबित आहे. सदर सर्व प्रलंबित थकबाकीबाबत लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे. या व यासह अन्य अनेक मागण्यांच्या बाबतीत एसटी कर्मचाऱ्यांनी आज कणकवलीत विभागीय कार्यालय शाळेबाहेर निदर्शने केली. यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये निर्णय होईपर्यंत कामगारांना देय असलेल्या सर्व प्रलंबित थकबाकी रक्कमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेल्या वाढीव थकबाकीची रक्कम माहे फेब्रुवारी २०२५ देय मार्च २०२५पासून पुढे तशीच सुरू ठेवावी. म्हणजे कामगारांचे दरमहा देय होणारे वेतन कमी होणार नाही असे कळवूनही त्यावर रा.प. प्रशासनने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर कामगारांना वाढीव ५० टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबत वारंवार मागणी करूनही सुमारे १ वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असतानाही सदरचा ५० टक्के महागाई भत्ता कामगारांना लागू केलेला नाही सदरचा ५० टक्के महागाई भत्ता थकबाकीसह कामगारांना माहे फेब्रुवारी देय मार्च २०२५ च्या वेतनापासून लागू करण्यात यावा.रा.प. कामगारांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून उचल मिळण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जानुसार उचल देण्याबाबत विनंती केलेली होती. त्यावरही रा.प. प्रशासनने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तरी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून उचल मिळणसाठी कामगारांनी केलेल्या अर्जानुसार उचल देण्यात यावी.
तसेच एस.टी.ची सुधारीत भाडेवाढ लागू करताना प्रवास भाडे टप्पा रू.११,१६,१७ व २३ असा ठेवल्यामुळे वाहकांना सुट्टे पैसे देण्याबाबत अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहकांमध्ये वाद निर्माण होत आहेत ते दूर करण्यासाठी पुर्वीप्रमाणेच रू.५ च्या पटीत सुधारीत भाडेवाढ लागू करण्यात यावी.
वरील सर्व प्रलंबित थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत सर्व प्रलंबित थकबाकी रक्कमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेल्या वाढीव वेतनाची थकबाकी माहे फेब्रुवारी २०२५ देय मार्च २०२५ पासून तशीच पुढे सुरू ठेवण्यात यावी. तसेच ५० टक्के महागाई भत्ता कामगारांना थकबाकीसह माहे फेब्रुवारी देय मार्च, २०२५च्या वेतनापासून लागू करण्यात यावा. त्याचप्रमाणे रा.प. कामगारांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून उचल मिळण्यासाठी केलेल्या अर्जानुसार उचल देण्यात यावी. खालील मुद्यांवर घेतलेल्या निर्णयानुसार अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नाही ती करण्यात यावी.
- मुद्दा क्र.९ः- प्रशासनाच्या सुचनेनुसार संघटनेने शिस्त व आवेदन कार्यपध्दतीत सुचविलेल्या बदलाबाबत उभयपक्षी बैठक घेऊन मान्य नवीन शिस्त व आवेदन कार्यपध्दती तयार करावी.
मुद्दा क्र. १०:- कोरोना कालावधीत ज्या कामगारांकडून रजेचे अर्ज घेतलेले आहेत अशा कामगारांच्या रजेच्या खात्यामध्ये सदरची रजा जमा करण्यात यावी. यासंबंधात संघटनेने कोल्हापूर, ठाणे व पुणे विभागाची उदाहरणे दिलेली होती. याबाबत संबंधित विभागाकडून मध्यवर्ती कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झालेला असून याबाबत त्वरीत पुढील कार्यवाही करण्यात यावी.
मुद्दा क्र. ११:- माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या ३ महिन्याऐवजी १२ महिन्यात चालविण्यात येणा-या नियतांची सरासरी विचारात घेऊन सदर सरासरीच्या ९५ टक्के चालक, वाहक यांना समय वेतनश्रेणीवर घेण्याचे मान्य केलेले आहे. परंतु याबाबत अद्याप मान्य केल्यानुसार सुधारीत परिपत्रकीय सूचना प्रसारीत झालेल्या नाहीत. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. - मुद्दा क्र.१३:- मल्टीट्रेडबाबत महाव्यवस्थापक (यं.अ.) यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केलेले असूनही अशी बैठक अद्याप घेतलेली नाही ती त्वरीत घेण्यात यावी.
मुद्दा क्र. १८:- उत्पन्नावर आधारीत मनुष्य बळाच्या श्रमिक तासातून २०० तास कमी करण्याचे सन २०१२-२०१६ च्या कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. सदर कराराच्या तरतुदीची अंमलबजावणी यंत्र अभियांत्रिकी खात्याने सन २०१३ मध्येच करून मनुष्य बळाच्या श्रमिक तासातून २०० तास कमी केलेले असताना यंत्र अभियांत्रिकी खात्याकडून पुन्हा सन २०२४ मध्ये मनुष्य बळाच्या श्रमिक तासातून २०० तास कमी करण्याबाबत परिपत्रकीय सूचना प्रसारीत करून कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत संघटनेने न्यायालयात दाखल केलेल्या कोर्ट केसमध्येही सदरचे कमी केलेले २०० तास रद्द करण्याबाबत आदेश देऊनही प्रशासनाकडून अद्याप त्याची कार्यवाही केलेली नाही. याबाबत महाव्यवस्थापक (यं.अ.) यांच्यासमवेत स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केलेले असूनही अशी बैठक अद्याप घेतलेली नाही ती त्वरीत घेण्यात यावी.
मुद्दा क्र.१९:- मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून पुणे मार्गे (नवीन एक्सप्रेस-वे) वर चालविण्यात येणा-या रा.प. बसेसना आर.टी.ओ. कडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केल्यामुळे व सदरची दंडात्मक रक्कमेची वसुली कामगारांकडून केली जात आहे ती थांबविण्यात यावी. यावर रा.प. चालकाचा दोष नसताना ज्या बाबीसाठी रा.प. चालक जबाबदार नाहीत. तथापि, दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे अशा प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये यासंबंधी महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्यामार्फत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे मान्य केलेले असतानाही अशी दंडात्मक कारवाई अद्याप होत असून सदर दंडाची रक्कम कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केली जात आहे. तरी याबाबत त्वरीत दखल घेऊन कर्मचा-यांच्या वेतनातून अशा त-हेची होणारी कपात थांबविण्यात यावी.
तसेच खालील मुद्यांवरही निर्णय होणे अपेक्षित आहे. - खात्याअंतर्गत झालेल्या बढती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचा-यांना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन रिक्त जागेवर बढत्या देण्यात याव्यात.
कार्यशाळा कर्मचा-यांची ज्या विभागात कमतरता आहे त्या विभागामध्ये सदरची कमतरता भरून काढण्यात यावी. उदा. पालघर विभाग. तसेच स्पेअर पार्टस्वाही त्वरीत पुरवठा करण्यात यावा.
या सर्व मागण्यांची पुर्तता होण्यासाठी रा.प. महामंडळातील सर्व कामगार/कर्मचारी यांनी हे निदर्शने करत मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या. या निदर्शनांमध्ये श्री विनय राणे विभागीय सचिव, सुरेंद्र मोरजकर विभागीय अध्यक्ष, दिलीप जी साटम केंद्रीय उपाध्यक्ष, अनिल नर विभागीय खजिनदार, नंदकिशोर घाडीगावकर आगार सचिव, दत्ता मराठे विभागीय कार्याध्यक्ष, अमिता राणे विभागीय कार्यालय सचिव, के बी कांबळे देवगड आगार सचिव, दिनेश रासम विभागीय कार्यशाळा सचिव महादेव आंबेस्कर कुडाळ आगार सचिव,
सचिन नाईक वेंगुर्ले आगार सचिव, बाळा मालवणकर मालवण आगार सचिव, सचिन भांबुरे सावंतवाडी आगार सचिव, आर एस राणे विजयदुर्ग आगार सचिव
व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.