भालचंद्र महाराज आश्रम रोडवर गेले सहा दिवस ओमनी कार बेवारस स्थितीत

पोलिसांचे लक्ष वेधल्यानंतरही कोणतीच कार्यवाही नाही
सदर बेवारस कारबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट प्रश्न उपस्थित
कणकवली शहरात भालचंद्र महाराज आश्रम रोडवर गेले सहा दिवस एक ओमनी कार बेवारस स्थितीत पार्किंग ठेवण्यात आली आहे. या कारला आतील भागातून लाल रंगाचे पडदे लावलेले असून याबाबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पोलिसांना तीन दिवसापूर्वी माहिती दिली. मात्र पोलिसांकडून या ओमनी कार बाबत कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरची कार आजही बेवारस स्थितीत भालचंद्र महाराज आश्रम रोडवर पार्क करून ठेवण्यात आली आहे. पार्किंग करून ठेवण्यात आलेली ही कार कुणाची? एवढे दिवस एका जागेवर पार्किंग करून ठेवण्यामागे नेमके कारण काय? या कारला आतील बाजूने पडदे लावण्यात आल्याने यामध्ये अन्य काही बाबी असू शकतील का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या घरा नजीक बेवारस स्थितीत चोरी केलेली दुचाकी सापडली होती. पोलिसांकडून शोध घेत असताना श्री नलावडे यांच्या सीसीटीव्ही मधील फुटेज च्या आधारे ही चोरी उघड झाली होती. सदरची कार देखील श्री नलावडे यांच्या सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याने ही कार या ठिकाणी कोणी लावली? हे उघड होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुनासारखे गंभीर गुन्हे उघडकीस येत असताना अशा प्रकारे बेवारस स्थितीमध्ये गेले सहा दिवस कार पार्किंग करून ठेवल्या बाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने श्री नलावडे यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.