तिलारी प्रकल्पाची पाईपलाईन कोसळली

बोगस कामामुळे लाखो रुपये पाण्यात

घोटगे, परमेत उभे राहणार पाणी संकट

केळी बागायती,शेती सुकून जाण्याची भीती

तिलारी प्रकल्पाची पाईपलाईन कोसळल्याने घोटगे,परमे येथील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पाणी संकट उभे राहिले आहे.
घोटगेवाडीतून घोटगे, परमेकडे जाणारी तिलारी प्रकल्पाची नदीच्या दोन्ही बाजूच्या कालव्याला जोडणारी पाण्याची पाईपलाईन वर्ष व्हायच्या आतच कोसळली.ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे प्रकल्पाचे सुमारे १५ ते २० लाख रुपये पाण्यात गेले.दुसरीकडे पाईपलाईन कोसळल्यामुळे घोटगे , परमे येथील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत त्यांच्या केळीच्या बागा आणि शेती सुकून जाण्याची भीती आहे.
तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून एक मायनर कालवा घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावात जातो. या कालव्यातून प्रति सेकंद ३,००० लिटर पाणी सोडले जाते.घोटगेवाडी व घोटगे या दोन गावांच्यामध्ये नदी आहे.नदीवर पाइपलाइन टाकून पाणी पलीकडे कालव्यात सोडले आहे.त्यासाठी नदीपात्रात खांब उभारुन लोखंडी सांगाडयामधून पाइपलाइन नेली आहे.वर्षभरापूर्वी लोखंडी सांगाडा आणि पाइपलाइन खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्यात आली.त्यासाठी तब्बल १५ ते २० लाख रुपये खर्च घालण्यात आले.प्रत्यक्षात ती रक्कम वाया गेली.कारण ठेकेदाराने केलेल्या बोगस कामामुळे ती पाईपलाईन कोसळली आणि शेतकऱ्यांसमोर शेती बागायती वाचवायची कशी हा प्रश्न उभा राहिला आहे.मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्यें यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाधिकाऱ्यांनी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान,कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी पाईपलाईनमध्ये कचरा साचून पाणी साठले आणि वजन वाढले.त्यामुळे घोटगेवाडीकडील जमिनीवरचे बांधकाम कोसळल्याने पाइपलाइन कोसळली अशी माहिती दिली.

१५ दिवस तरी पाणी नाही..

आता या ठिकाणी पुन्हा दुरुस्ती आणि बांधकाम करावे लागणार आहे.त्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील आणि तेवढे दिवस घोटगे आणि परमे या गावातील केळी बागायती आणि शेतीला पाणी मिळणार नाही.

अधिकाऱ्यांचे ‘ पाण्या ‘ वर खापर

दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करताना ज्यावर हा लोखंडी सांगाडा किंवा पाण्याची पाइपलाइन उभी राहणार आहे तो सुरुवातीचा खांब हे वजन पेलू शकणार का ,किंवा त्याची पुनर्बांधणी किंवा मजबूतीकरण आवश्यक आहे का ,हे पाहण्याची जबाबदारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची होती.त्यांचे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली; मात्र अधिकारी याचे खापर कचरा आणि पाण्यावर फोडत आहेत हे न पटणारे असल्याचे मत अनेकांनी मांडले.

error: Content is protected !!