वाढते वनवे ठरतायत जैवविविधतेवर घाला

सिंधुदुर्गाचे पर्यावरण धोक्यात

आचरा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक अनैसर्गिक गोष्टींमुळे लागणारया आगीमुळे येथील जैवविविधतेला,पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे..अशा आगीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष न करता त्या विझविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून केले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागिल काही दिवसांपासून विविध ठिकाणी जंगलाला आग लागून जैवविविधतेचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. वेंगुर्ला तालुक्यात आरवली, सावंतवाडी तालुक्यात नरेंद्र डोंगर, कुडाळ तालुक्यात पडवे, मालवण तालुक्यात आडवली-श्रावण, राठीवडे-हिवाळे, देवगड तालुक्यात मिठबाव याठिकाणी मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र जळून खाक झाले आहे. अजूनही आग धुमसत आहे. याशिवाय त्रिंबक, पळसंब, तोंडवळी याठिकाणी थोडया प्रमाणात आग लागून जंगल जळाले आहे.
गुरांसाठी नवीन चारा मिळावा, काजू लागवडीसाठी जागा उपलब्ध व्हावी, मधमाश्यांच्या पोळयातून मध काढता यावा,बेजबाबदारपणे सिगारेटचे थोटूक रस्त्याकडेला भिरकावने आदी शुल्लक कारणातून तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी जंगल भागात आग लावली जात आहेत. तसेच चूकून एखाद्या जंगलाच्या ठिकाणी आग लागल्यास काजू कलमांच्या बागा नसल्यातर त्याकडे दुर्लक्ष केले जात असते
अशाप्रकारच्या आगीमुळे बहुमुल्य अश्या जंगली वनस्पतींसहीत सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची अंडी, लहान पिल्ले,शेतकऱ्यांना मदत करणारे जीवजंतू जळून जात आहेत. पर्यावरणच्या संतुलनासाठी आवश्यक असणारे हे घटकच कोकणची खरी संपत्ती आहे याचा विसर स्थानिकांना पडला आहे. जंगलांचे अस्तित्व राहीले तरच मानवाचे अस्तित्व राहणार आहे, याबाबत समाजातील जागृती होणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या आगी लागू नयेत याची खबरदारी घ्यावी व चूकून लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता स्थानिकांनी ती तात्काळ विझवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे.

अर्जुन बापर्डेकर / आचरा

error: Content is protected !!