गांधीजींना समाजाशी एकरूप व्हायचे होते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज सक्षम बनवायचा होता
प्राचार्य कॉ.आनंद मेणसे यांनी विचार मांडताना व्यक्त केले मत


म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार एकमेकांना पूरक अशाच स्वरूपाचे होते. म.गांधी यांना समाजाशी एकरूप व्हायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज सक्षम बनवायचा होता. यातून भारत देश सर्वच आघाड्यावर विकसित व्हावा असा या महामानवांचा दृष्टिकोन होता.
दोनही महामानव सत्याग्रहाच्या माध्यमातून समाज बदलासाठी कटिबद्ध होते व त्याच मार्गाने आपली आंदोलने करण्याचा प्रयत्न करत होते. डॉ. बाबासाहेबांची व्यक्तिमधील कार्यकर्ता घडवण्याची शक्ती वेगळी होती, तशीच ती महात्मा गांधीजींची होती.
सनातन धर्माचा वैचारिक पाया मनुस्मृति आहे तर संविधान हा देशाचा धर्मग्रंथ आहे. याकरिता हे दोन्ही ग्रंथ आपल्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवून कार्यकर्त्यांनी त्यांचा तौलनिक अभ्यास केल्यास या देशातील विषमता आणि समता याची खरी माहिती होण्यास मदत होईल. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी मनुस्मृतीचा अभ्यास केल्याने त्यांना विषमतेचे मूळ समजण्यास मदत झाली. या विषमतेच्या निर्मूलनासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहीले.
बाबासाहेब आंबेडकरांचा २० मार्च १९२७ चा चवदार तळ्याचा सत्याग्रह, २५ डिसेंबर १९२७ चे मनुस्मृति दहन आणि ३० मार्च १९३० चा काळाराम मंदिराचा सत्याग्रह या तीनही घटनांचा गांधीजीच्या मनावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची अस्पृश्यता निर्मला विषयीची मते अधिक स्पष्ट झाली होती. म. गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी ‘आंतरजातीय विवाह’ या बाबासाहेबांच्या विचारांना पुष्टी देऊन मी यापुढे आंतरजातीय विवाहाणाच उपस्थित राहीन, ज्यात वधू व वरापैकी एक सवर्ण एक मागासवर्गीय असेल असा संकल्प केला होता. तो संकल्प त्यांनी कृतीतही आणला. म. गांधीजींची सावली मानली जाणारे त्यांचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांच्या मुलाचे लग्न जातीत झाल्याने ते त्यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले नाहीत.
पुणे कराराबाबत विचार मांडताना मेणसे यांनी सांगितले की १९१६ साली लोकमान्य टिळक यांनी जातीनिहाय मतदार संघ असावेत असा विचार मांडला होता. याच विचारांवर आधारित ब्रिटिशांना या देशात जातवार मतदार संघ निर्माण करून देशाचे विभाजन करायचे होते. महात्मा गांधींचे असे म्हणणे होते की राखीव मतदारसंघ असतील परंतु मतदान मात्र एकाच विशिष्ट जातीचे मतदार न करता सर्वच समाजाचे मतदार करतील. यामुळे देशाच्या एकतेला बाधा येणार नाही. या गांधीजींच्या विचारांचा बाबासाहेबांनी व्यापक पातळीवर विचार करून पुणे करारावर सही केली. बाबासाहेबांनी भारत देश एकसंघ ठेवायचा होता. हे सर्व समाज घटकांनी समजून घेणे गरजेचे आहे. पुणे करार ही बाबासाहेबांच्या विचारांची ‘विजय पताका’ आहे.
१९४६ साली जेव्हा संविधान लिहिण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार होती तेव्हा महात्मा गांधी यांनी या समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर असायला हवेत असे ठामपणे सांगितले आणि त्याप्रमाणे संबंधितांना कृती करायला लावली.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाती-निर्मूलनाचे विचार परस्पर पूरकच होते हे समजून घेणे गरजेचे आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीयांसाठी वेगवेगळ्या पातळीवर आरक्षणाची तरतूद केली यामागे ‘जाती मुक्त भारत’ निर्माण करणे ही त्यांची आरक्षणासाठीची मूळ कल्पना होती. केवळ राजकीय दृष्ट्या समाज एकत्र आणून चालणार नाही तर तो सामाजिक दृष्ट्याही एकत्र आणणे गरजेचे आहे, तरच सामाजिक समता प्रस्थापित होण्यास चालना मिळेल. म्हणून राजकीय आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्ता मंडळींनी, अभ्यासकांनी म. गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे साहित्य सजगपणे वाचून हे दोन्ही महामानव परस्परांना कसे पूरक विचार करत होते आणि भारत देश कसा बलवान करण्यासाठी झटत होते. याची कल्पना येईल. भविष्यासाठी त्याची नितांत गरज आहे.
म. गांधींच्या जयंती सप्ताहा निमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन गोपुरी आश्रमाच्या वतीने करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समाजवादी नेत्या कमालताई पारुळेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश लळीत, अॅड. देवदत्त परुळेकर, मंगलताई परुळेकर, आश्रमाचे उपाध्यक्ष विजय सावंत, सल्लागार दादा कुडतरकर, अॅड. मनोज रावराणे, सचिव विनायक मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत, पत्रकार विजय शेट्टी, तानाजी कांबळे, सल्लागार जयप्रकाश लब्दे, फोंडा कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीश कामत, कॉम्रेड विनोदसिंह पाटील, अंकुश कदम, जनीकुमार कांबळे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. बाळू राठोड, महेश पारुळेकर, चित्रकार नामानंद मोडक, रावजी यादव, सूर्यकांत कदम, सुचिता गायकवाड, कवी मोहन कुंभार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, गोपी पवार, पुरुषोत्तम कदम, प्रदीप मांजरेकर, संतोष कांबळे, प्रसाद घाणेकर, कवयित्री सरिता पवार, आनंद तांबे, बी.जी. कदम आदी मान्यवरांसाहित जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख सतीश लळीत यांनी करून दिली. आभार अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आभार मानले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!