छत्रपतींच्या मालवण मधील पुतळ्याकडील कामे अनुभव नसलेल्या मजूर संस्थाना

पालकमंत्र्यांनी अनुभव नसलेल्या ठेकेदारांना कामे द्यायला भाग पाडले
राणे कंपनीचे तोंड आता कुणी धरले?
पंचधातूचा सांगून लोखंडाचा वापर करून बनवला पुतळा
आमदार वैभव नाईक यांचे सनसनाटी आरोप
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुरुवातीलाच भ्रष्टाचार झाला होता. बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तोडफोड करून ही कामे वाटप केली. पुतळा व सुशोभीकरणाचे काम हे एकाच व अनुभव असलेल्या ठेकेदाराला मिळण्याची गरज होती. मात्र आपल्या ठेकेदारांना कामे मिळावी त्याकरिता तीन कामांचे सात ते आठ भाग करण्यात आले. ही कामे मजूर संस्थेला देण्यात आली. मजूर संस्थेला कोणताही कामाचा अनुभव नसतो. मात्र वेगवेगळ्या मजूर संस्थांना एकाच दिवशी ही कामे देण्यात आली. त्यामुळे या कामांमध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला होता. जयदीप आपटे यांना कामाचा कोणताही अनुभव नसताना ते केवळ ठाण्याचे आहेत म्हणून त्यांना सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा पुतळा पंचधातूचा म्हणून त्याचं अंदाजपत्रक बनवण्यात आलं. तसे पैसे देण्यात आले. परंतु हा पुतळा पंचधातूचा नसून त्यात लोखंडाचा जास्तीचा वापर करण्यात आला होता हे काल स्पष्ट झालं. त्यामुळे पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांनी याबाबतची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. या पुतळ्याची देखभाल केली पाहिजे म्हणून काही दिवसांपूर्वी नेव्हीला पत्र दिलं असं सांगण्यात आलं. व हे पत्र त्यादिवशी जावक करण्यात आलं. हा जबाबदारी झटकण्यासाठी केलेला प्रकार असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. वेगवेगळ्या विषयावर आपलं ज्ञान पाजळणारी राणे कंपनी मात्र या विषयापासून दूर आहेत असा टोला देखील आमदार नाईक यांनी लगावला. आता राणेंच तोंड कोणी धरले आहे का? असा सवाल आमदार नाईक यांनी केला. या कामाच्या भ्रष्टाचारातून कुणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचला हे सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे. या पुतळ्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी महाविकास आघाडी व शिवप्रेमींच्या वतीने उद्या मालवण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विधान परिषदेची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात जे वक्तव्य केले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी आम्ही यावेळी करणार आहोत अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची व आमची अस्मिता आहे. व त्यांच्या बाबतीत असं जर कोणी कृत्य करत असेल तर यासारखे अनेक गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत असे उत्तर आमदार नाईक यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिले. या संपूर्ण भ्रष्टाचाराला बांधकाम खाते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या कामामध्ये भ्रष्टाचार झाला व येथे कधीतरी काहीतरी विपरीत घडणार हे पालकमंत्र्यांना माहिती होतं. मात्र त्यांनी हे लपवलं असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. या कामामध्ये भ्रष्टाचारात सहभागी असणारे यांच्यावर कारवाई व बांधकाम मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा त्यांनी दिला. आमदार नितेश राणे यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय झालं त्यावर अगोदर बोलावं. कारण या भ्रष्टाचार करणारे हे सगळे भाजपचेच बगलबच्चे असल्याने यावर नितेश राणे बोलणार नाही असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठेकेदार व भ्रष्टाचार याशिवाय अन्य कुठल्या गोष्टी माहिती नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते व फयान वादळात 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहिले होते. व आताच्या दिवसात किल्ल्यावर पंचवीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहत असतात. त्यामुळे आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकांना माहिती नसलेले विषय सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला. जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार करतात, अरबी समुद्रामध्ये छत्रपतींचा स्मारक होणार अस गेली दहा वर्षे जे सांगतात व महाराष्ट्रातील जनतेला फसवतात अशा लोकांची हंडी महाराष्ट्रातील जनता फोडल्याशिवाय राहणार नाही असा टोला आमदार नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली