महिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी गोपुरी आश्रमात विक्री केंद्र
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महिला विकासाच्या नव्या पर्वाची गोपुरी आश्रमात सुरुवात
कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७६ वर्षापूर्वी म्हणजेच ५ मे १९४८ साली कोकणातील शेतकरी वर्गाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रम हा प्रयोग मांडला त्याचे काम गेली ७६ वर्षे अविरत सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीची व्यवस्था व्हावी याकरिता ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत,सदाशिव उर्फ बाबू राणे व युवा उद्योजक अमोल परब यांच्या संकल्पनेतून गोपुरी आश्रमात स्वयंसहायता समूहाच्या महिला वर्गाकरिता विक्री भांडार उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती सन्मान प्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ शिक्षक मारुती पालव गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.
भविष्यात गोपुरी आश्रमात महिला बचत गटाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सध्या श्रीराम समर्थ- ‘राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामसंग’ सिंधुदुर्ग महिला प्रभाग संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या संघाने हे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प सोडला आहे. प्रामुख्याने स्वयंसहायता समूहाच्या मालाच्या विक्रीचा प्रश्न असतो त्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ग्रामीण भागातील शेतकरी व दारिद्र्य रेषेखालील महिलांना शास्वत रोजगार मिळाला तर त्यांच्या कौटुंबिक आर्थिक जीवनावर, आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पुढील काळात स्वयंसाहायता समूहाच्या उत्पादित मालाचा दर्जा सुधारण्याकरिता खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. गोपुरी आश्रमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या काजू प्रक्रिया उद्योगांच्या विकासाचा प्रयोग गेली वीस वर्षे यशस्वी केला आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान १२०० महिलांना या उद्योगात रोजगार मिळाला आहे. यापुढे महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमात निमित्त गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर, सदस्य विनायक सापळे, मुरादअली शेख, सदाशिव उर्फ बाबू राणे, सुरेश रासम, जावेद खान, राजाराम गावडे, सहदेव पाटकर, युवा कार्यकर्ते प्रदीप मांजरेकर, श्री परुळेकर, डॉ. प्रमोद घाडीगावकर, श्री कमलाकर निग्रे, कवी श्रेयश शिंदे,मिलिंद पालव,सचिन सादये,आदेश कारेकर, प्रियांका मेस्त्री, मृदाली हजारे, नताशा हिंदळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार युवा उद्योजक अमोल परब याने मानले.
कणकवली, प्रतिनिधी