ऐश्वर्य मांजरेकर महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा आणि मुंबईचे पालकमंत्री मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मालवणच्या सुपुत्राचा सन्मान
सिंधुदुर्ग :- महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विविध स्वरुपाचे पुरस्कार देऊन गौरव करीत असते. त्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांच्या पुरस्कारांचा दर्जाही मोठा असतो. त्यामुळे ज्यांचा गौरव केला जातो ते पुरस्कार स्वीकारताना हा आपल्या राज्यातील जनतेच्या सरकारचा गौरव समजून स्वीकारतात. राज्यातील युवकांना त्यांच्या तरुण वयात समाज सेवेसाठी प्रोत्साहन मिळावे. युवकांना सामाजिक हिताची कामे करण्याची गोडी लागावी व सामजिक जडणघडणीतील त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशा उद्देशाने राज्य शासनाने युवा पुरस्कार देण्यास सुरवात केली. क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या युवा क्षेत्रात मोलाची कामगिरी करून जिल्ह्याचा मान वृध्दींगत केल्याबद्दल ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या मालवणच्या सुपुत्रास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे सन्मानित कऱण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपजिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम १०,००० आकर्षक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , पुष्पगुच्छ असे आहे. सदर पुरस्कार ऐश्वर्य मांजरेकर यांना मिळाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांनी त्याचे अभिनंदन केले.