कणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची मागणी
अन्यथा दुर्घटना घडल्यास नगरपंचायत प्रशासनाला धरणार जबाबदार
कणकवली शहरात आज सकाळच्या सुमारास श्रीधर नाईक चौक येथे एका इमारतीवरील लोखंडी छप्पर उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे सुदैवाने कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कणकवली शहरात बांधकाम परवानगी देताना मुख्याधिकाऱ्यांकडून अटी व शर्ती घातल्या जातात. मात्र या अटी शर्ती प्रमाणे बांधकामे होतात का? तसेच इमारतींच्या वरील ज्या शेड उभारण्यात आल्या या सुरक्षित व नियमानुसार आहेत का? याची तपासणी करण्याची गरज असून कणकवली शहरातील अशा सर्व सात मजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी कणकवली शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केली आहे. कणकवली नगरपंचायत कडून बांधकाम परवानगी देत असताना ज्या अटी शर्ती घालण्यात आल्या त्याचे पालन बांधकाम करताना झाले का? ही पाहण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची आहे. अशा प्रकारे दुर्घटना घडून निष्पाप लोकांचे बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले उचलली जाणे गरजेचे असून प्रशासनाकडून अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे अशा दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासनाला जबाबदार धरले जाईल असा इशारा देखील कन्हैया पारकर यांनी दिला आहे. कणकवलीत आज घडलेल्या घटनेनंतर कणकवली शहरातील अनेक बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या बांधकामांना तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत नगरपंचायत ्स्तरावरून कार्यवाही होणे गरजेचे आहे अशी मागणी देखील श्री पारकर यांनी केली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली