आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार

अंकित कंसल : विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे

गावकरी ठरवतील त्या जबाबदार माणसाशी आम्ही केव्हाही चर्चेसाठी तयार आहोत, कारण आम्हाला विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे, अशी भूमिका सासोली येथील ओरिजिन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित कंसल यांनी पत्रकार परिषदेत मांडली.ते म्हणाले,आम्ही या जमिनी रीतसर खरेदीखताने विकत घेतल्या आहेत.जमीन मालकांना त्यांनी ठरवलेल्या दराने पैसे दिले आहेत.
आपण शेतकऱ्यांच्या ओसाड जमिनी घेतल्या. त्यात मायनिंग प्रकल्प आणला नाही, तर स्थानिकांना रोजगार देणारा पर्यावरणपूरक प्रकल्प आणला. इथे रिसॉर्ट, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल उभे राहणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार दिला जाणार आहे. स्वार्थासाठी चांगल्या प्रकल्पांना राजकीय विरोध होत असेल तर जिल्ह्यात कोण येणार, जिल्ह्याचा विकास कसा होणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.
त्यांनी सांगितले की,हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी माणसे आम्ही त्यांची जमीन हडप केल्याचा आरोप करतात. आम्ही जितकी जमीन खरेदी केली त्यापेक्षा अधिक जमीन असेल तर आम्ही सोडू, पण विकत घेतलेली जमीन कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आम्ही त्यांचा आरोप खोडून काढण्यासाठी मोजणी करण्याचा निर्णय घेतला, त्याला आम्हाला खासगी नको सरकारी मोजणी हवी असे सांगून विरोध केला. म्हणून शासकीय यंत्रणेला सांगून सरकारी मोजणी आणायला लावली. त्यालाही यांनी विरोध केला.त्यांनी सर्वे का रोखला कारण त्यांना माहीत होते जर मोजणी झाली तर ‘दूध का दूध…’ होईल, त्यामुळेच ते प्रत्येकवेळी वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आणून विरोध करतात.पूर्वी आमची मशीनरी तोडली, कामगाराला मारहाण केली त्यामुळे मोजणीवेळी आम्ही सुरक्षारक्षक आणले;पण त्यांना सुरक्षेसाठी आमच्या जागेत ठेवले होते. मोजणीवेळी हजर राहण्याची मुभाही स्थानिक शिष्टमंडळाला दिली होती. इतके सगळे असताना यांचा विरोध का असा प्रश्नही त्यांनी विचारला.

…म्हणून खंडणीची तक्रार करत नाही

आमचा सगळा व्यवहार कायदेशीर व पारदर्शी आहे. तरीही केवळ पैसे मिळवण्यासाठी काहीजण स्वतः आणि राजकारणी यांना पुढे करुन विरोध करतात. पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून आम्ही खंडणीची तक्रार करत नाही. जनता आणि मीडिया पाठीशी राहिला तर तीही करू आणि आम्ही फसवून जमिनी घेतल्या असतील तर त्यांनी तक्रार करावी, न्यायालयात जावे. आम्ही आमची बाजू तिथे मांडू, असेही श्री. कंसल म्हणाले.

त्यावेळचे एजंट, आताचे विरोधक

यावेळी त्यांनी गावातील दोघान्ची नावे घेऊन या जमीन व्यवहारात एजंट असणारे व आपल्या जमिनी आम्हाला देणारे त्यांना पुढे काम न मिळाल्याने काही राजकारण्यांना पुढे करुन विरोध करत आहेत असे सांगितले.तसेच काही राजकीय पदाधिकारी वरिष्ठाना चुकीची माहिती देत आहेत.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. आता त्यांची वेळ घेऊन मी कंपनीची बाजू मांडणार आहे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहे असेही सांगितले.

प्रतिनिधी, दोडामार्ग

error: Content is protected !!