कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ
पोलिसांकडून बॅगांची कसून तपासणी
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर गडग्याच्या आतील भागात असलेल्या वाहन शेडमध्ये दोन बेवारस बॅगा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काल बुधवारी संध्याकाळ पासून या बॅगा बेवारस स्थितीत असल्याने याबाबत संशय निर्माण झाला होता. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे कार्यालयीन कामा निमित्ताने बाहेर असल्याने त्यांच्या कानी हा प्रकार घालण्यात आला. व त्यांच्या सूचनेनुसार याबाबत कणकवली पोलिसांना पत्र देण्याचे ठरले. मात्र कणकवली पोलिसांनी हे पत्र स्वीकारले नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान काल बुधवारी संध्याकाळी या बॅगा आढळल्यानंतर कणकवली पोलीस आज दुपारी 11 वाजता घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाबाहेर बेवारस स्थितीत आढळलेल्या या बॅगांमध्ये नेमके काय आहे? याबाबत पोलिसांनी तपासणी सुरू केली असता या बॅगांमध्ये कपडे व अन्य घरगुती साहित्य आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राजेंद्र नानचे, पोलीस कर्मचारी किरण कदम, महिला पोलीस श्रीमती कांबळे यांनी या बॅगांमधील साहित्याची तपासणी करताच त्यामध्ये आधार कार्ड व एक डायरी सापडली. त्यावर सापडलेल्या एका मोबाईल नंबर वर पोलिसांनी संपर्क साधला असता सदर बॅगांचा मालक असलेली संतोष इंदुलकर ही व्यक्ती लांजा येथे उतरली असल्याची बाब समोर आली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते मुंबईहून लक्झरीने लांजा येथे उतरले. मात्र त्यांनी आपल्या बॅगा तेथे घेतल्या नाहीत. लांजा येथून ही लक्झरी पुढे आल्यावर लक्झरी चालकाने या बॅगा कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या जवळ टाकल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र काही संबंध नसलेल्या या बॅगांचा खटाटोप मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना विनाकारणी सहन करावा लागला. दरम्यान लांजा येथील संतोष इंदुलकर हे उद्या कणकवलीत बॅगा ताब्यात घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली. मात्र बेवारस स्थितीतील बॅगानी पोलिसांनी सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र झोप उडवली. या दरम्यान मात्र कोकणात सर्रास प्रचलित असलेली “कोणाच्या म्हशी व कोणाला उठाबशी” ही म्हण मात्र अनेकांच्या तोंडावर या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली.
दिगंबर वालावलकर /कणकवली