जलजीवन मिशन अंतर्गत रामदास विखाळे, निनाद विखाळेंच्या कामांची चौकशी करा!

आमदार नितेश राणे यांची राज्याच्या ग्रामीण पुरवठा मंत्र्यांकडे मागणी

अनेक योजनांची कामे राहिली आहेत अर्धवट स्थितीत

कणकवली मतदारसंघातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील “जलजीवन मिशन” या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील सुमारे १७ कामे कणकवली तालुक्यातील शासकीय ठेकेदार श्री. रामदास विखाळे व श्री. निनाद विखाळे या दोघानी घेतली आहेत. या दोघांनी घेतलेल्या कामांबाबत स्थानिक जनता व लोकप्रतिनीधी यानी अनेक तक्रारी माझेकडे केलेल्या आहेत. याबाबत मी योजनेचे सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता श्री. महाजनी याना आढावा बैठकी दरम्यान प्रत्यक्ष जातीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. परंतु सदर ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने अनेक योजनांची कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाची कामे केल्याने जनतेला ऐन उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्याचा रोष जनता सरकारवर व्यक्त करीत आहे.
म्हणून रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघांनी मिळून कणकवली व वैभववाडी तालुक्यामध्ये घेतलेल्या सर्व नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करण्यात यावी व त्याना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!