साने गुरुजी कथामालेच्या “चम चम चम” गाण्याचे अनावरण!


छोट्यांसोबत मोठ्यांना आनंदी ठेवणारे बालगीत.


आचरा–अर्जुन बापर्डेकर

साने गुरुजी कथामाला मालवण शाखेने अलीकडेच गंगाधर महांबरे यांच्या “चम चम चम पुनवेचा” या गीताचे अनावरण वर्षा आनंद मेळाव्यात केले. सदर गीताला श्री. अमर पवार यांचे संगीत लाभले असून त्याला स्वर श्रीम. रश्मी रामचंद्र आंगणे यांचा लाभला आहे. या गीताची निर्मिती रामचंद्र विष्णू आंगणे, स्वीय सहाय्यक माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.
सदर गीताचे अनावरण सुरेश शा. ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली आणि चारुशीला देऊलकर (मालवण), सुरेश गावकर (आचरे) या ज्येष्ठ कथामाला सदस्यांच्या उपस्थितीत झाले.
या गीताच्या अनावरण प्रसंगी बोलताना सुरेश शा. ठाकूर म्हणाले, “सौ. रश्मी आंगणे आणि रामचंद्र आंगणे यांनी हे गीत अक्षरश: तन-मन-धन अर्पण करून निर्माण केले. कथामालेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या रश्मी आंगणेंचा स्वर आणि रामचंद्र आंगणे यांचे निर्मिती कौशल्य यामुळे या दुधाच्या चांदण्यात संगीताचे केशर पडले आहे व हे गीत मुलांसोबत पालकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरणार आहे.”
हे गीत पूर्वी स्व. अरविंद नेवगी मालवण कथामालेत गायचे. त्यांची आठवण सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी पुन्हा जीवंत केली. या गीतासाठी प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी (गोवा प्रदेश कथामाला) यांचे सहकार्य लाभले.
यावेळी रश्मी आंगणे व रामचंद्र आंगणे यांचा सुरेश गावकर, चारुशीला देऊलकर आदी ज्येष्ठ कथामाला कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
“हे गीत शाळा-शाळात, मुलांच्या मनामनात व पालकांच्या तनामनात जाईल, त्याच वेळी या गीताच्या निर्मितीचे श्रेय मला लाभेल,” असे विचार श्री. आंगणे यांनी व्यक्त केले. मालवण कथामालेच्या सर्व आबालवृद्ध कार्यकर्त्यांनी नाचून व गाऊन या गीताचे स्वागत केले

error: Content is protected !!