यावर्षीही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच

यावर्षी पाऊस नियमित वेळेत तसेच चांगली सुरुवात करणार असल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी प्रशासनानेही रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर केला. मात्र, अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असले, तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अजूनही पावसाचे प्रमाण कमीच आहे. १२ जूनपर्यंत जिल्हयात सरासरी ३५२ मिमी पाऊस अपेक्षित असताना २२३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होईल, असे सांगण्यात येत होते. तशी पावसाची सुरुवातही झाली. मात्र, नंतर प्रशासनाकडूनही दिलेले अलर्टचे अंदाजही पावसाने फोल ठरविले आहेत. पावसाचा तुलनात्मकदृष्ट्या विचार केला, तर २०२३ मध्ये १२ जूनपर्यंत केवळ ३३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. अलिकडच्या कालावधीतील ही सर्वात कमी नोंद होती. यावर्षीही अद्याप सरासरी एवढा पाऊस झाल्याचे दिसत नाही.