वृक्षारोपण करत वाढदिवस साजराः ऋतुराजचा उपक्रम
सावंतवाडी/प्रतिनिधी
सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे, धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु काहीजण याला अपवादही आहेत, काही तरुण सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव साधुन सामाजिक उपक्रम राबवत असतात. असाच एक उपक्रम ऋतुराज सावंत या तरूणाने नुकताच राबवला आहे.
सहा. शिक्षक श्री.प्रदीप सावंत व अधिपरिचारिका सौ. प्राजक्ता सावंत यांचे चिरंजीव ऋतुराज सावंत यांच्या २१ व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मूळगावी म्हणजे शिवडाव कणकवली येथे वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर या भागात असलेल्या पहिल्या काही झाडांना आणि ऋतुराज यांनी लावलेल्या झाडांना पाणी देण्यात आले.
श्री.प्रदीप सावंत हे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतात, त्यामुळे ऋतुराज व संपूर्ण कुटुंबियांना वृक्षारोपणाची आवड असून त्याचे महत्त्व माहीत आहे.
विशेष म्हणजे ऋतुराज याने आपला २१ वा वाढदिवस आपल्या मूळ गावी आपल्या आजोबांसोबत साजरा केला व आपल्या ९३ वर्षांच्या आजोबांबरोबर वृक्षारोपण केलं. अश्या प्रकारे एकाच वेळी तीन पिढ्यांनी एकत्रीत येऊन सुंदर असा हा उपक्रम करून “वृक्षारोपण आज काळाची गरज आहे, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे असा संदेश दिला”. ह्यावेळी काजू व आंब्याची रोपे लावण्यात आली.
यावेळी श्री.मारुती सावंत, प्रदीप सावंत, प्राजक्ता सावंत, ऋतुराज सावंत, रवीनारायण साटम, मानसी साटम, प्रकाश साळसकर, उपेंद्र साटम, गोपीनाथ लाड, ओम साटम इत्यादी उपस्थित होते.