गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाने कणकवलीत गझल लेखन व गायन कार्यशाळा संपन्न
अखंड लोकमचं च्या वतीने करण्यात आले होते आयोजन
गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील नगर वाचनालय सभागृहामध्ये नुकतेच गजल नवाज भिमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणाऱ्या श्रोत्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी इतर मान्यवरांबरोबरच अखंड लोकमंच सिंधुदुर्ग चे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक उपस्थित होते.
दिवसभराच्या या कार्यशाळेमध्ये गजल लेखनातील विविध पैलूनुसार गजलेचे होणारे लेखन याविषयी गझल नवाज भिमराव पांचाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सकाळच्या सत्रात गजल लेखनाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखवले. गझल लेखन ही साधी, सरळ व सोपी गोष्ट नसून गजल लेखनामध्ये टतस्थपणा आवश्यक आहे. माणसाच्या जीवनातील सुखाच्या अनुभवांबरोबरच वेदनांचे विविध पट गजलेतून उलगडून दाखवले जातात. जगण्याच्या संदर्भातील साध्या साध्या गोष्टीही गझल लेखनातून काळजाला भेदून जाऊ शकतात याविषयीच्या अनेक शायऱ्या भीमराव पांचाळे यांनी म्हणून दाखवल्या.
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सुमधुर आणि भारदस्त आवाजामध्ये भीमराव पांचाळे यांनी गजल गायनाचे अनुभव पेश केले.
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारा हा गजल लेखन व गायनाचा दिवस श्रोत्यांच्या सार्थकी लागल्याचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुंभार यांनी केले. यावेळी अखंड लोकमंचचे शैला कदम, विनायक सापळे, कल्पना मलये, संतोष कांबळे व अभिनेते निलेश पवार याचबरोबर कणकवली व परिसरातील काही महानीय व्यक्ती उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखंड लोक मंचच्या सर्वांनी मेहनत घेतली.