मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत जानवली ग्रामस्थांनी रोखला महामार्ग

तब्बल दीड तासाहून अधिक काळ महामार्ग धरला रोखून

दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा

तहसीलदारांच्या आश्वासनाअंती रास्ता रोको मागे

जानवली बौद्धवाडी येथील अनिल कदम यांचा अपघाती मृत्यू होऊन व त्यांना धडक देऊन पळणाऱ्या वाहनाचा 24 तास उलटून देखील शोध न लागल्याने आक्रमक झालेल्या जानवली ग्रामस्थांनी जानवली बौद्धवाडी येथे आज शनिवारी अचानक रास्ता रोको करत महामार्ग रोखून धरला. अर्धा – एक नव्हे तब्बल दीड तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत प्रांताधिकारी व केसीसी बिल्डकॉनवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका जानवली ग्रामस्थांनी घेतली. यावेळी सुरुवातीला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी कायदा मोडू नका, सनदशीर मार्गाने मागणी करा वरिष्ठांपर्यंत मागणी पोहोचवतो असे सांगितले. मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तुमच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही. इतर विषयात पोलीस आक्रमक होतात मग 24 तासात पळालेली गाडी का मिळत नाही? असा सवाल पोलिसांना ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी घटनास्थळी तात्काळ जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. रास्ता रोको मागे घ्या आपण धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेऊ व आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवू असे सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत येथुन हटणार नाही, प्रांताधिकारी घटनास्थळी आलेच पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. केसीसी कंपनीच्या अनेक चुकीच्या कामांमुळे जानवली गावात आतापर्यंत सात जणांचे जीव गेले आहेत. महामार्गावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण या अशा चुकीचे व बेजबाबदार काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी जानवली ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी देत प्रशासनाचा निषेध देखील केला. तसेच अनिल कदम यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी केली. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या डीवायएसपींचे देखील ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घटनास्थळी येत याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन मंगळवारी बैठक लाऊ व बैठकीनंतर याबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. मात्र ग्रामस्थांनी केसीसी बिल्डकॉनवर गुन्हा केव्हा दाखल करणार ते सांगा? असा पवित्रा घेतला. मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतल्यावर तहसीलदार श्री देशपांडे यांनी याप्रकरणी संबंधित यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले जातील व त्यानंतर केसीसी कंपनी वर कारवाईबाबत पुढील प्रक्रिया केली जाईल असे श्री देशपांडे यांनी सांगितले. मात्र ग्रामस्थ कोणत्याही स्थितीत ऐकण्याची भूमिका घेत नसल्याने अखेर तहसीलदार यांनी याबाबत येत्या मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ मात्र माझ्या अधिकाराबाहेर जाऊन तुम्हाला कुठलेही चुकीचे आश्वासन देणार नाही. असे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. मात्र तहसीलदार श्री देशपांडे यांनी संबंधित कुटुंबीयांची मी भेट घेतो व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अन्य योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच अजित पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, उपसरपंच किशोर राणे, सुदीप कांबळे, राजू शेट्ये, भालचंद्र दळवी, भगवान दळवी, नयन दळवी,, राजू हीर्लेकर यांच्यासह जाणवली बौद्धवाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती उशिरा मिळाल्याने तब्बल एक तासानंतर पोलिसांचे दंगल नियंत्रक पथक ओरोस वरून जाणवलीत घटनास्थळी दाखल झाले.

error: Content is protected !!