माजी आमदार परशुराम उपरकर पुन्हा शिवसेना ठाकरे गटात जाणार?

उपरकारांकडून मात्र वृत्ताला अद्याप दुजोरा नाही
3 मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता
ठाकरे गटातील नेत्यांशी उपरकर यांना जुळवून घ्यावे लागणार
माजी आमदार परशुराम उपरकर हे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. मात्र याबाबत उपरकर यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगत अप्रत्यक्षपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान येत्या 3 मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या वृत्ताला उपरकर यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. उपरकर हे मनसेमध्ये प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. त्यानंतर अंतर्गत वादातून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. व त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा मार्ग अवलंबला होता. मात्र दरम्यानच्या काळात राजकीय बदललेल्या घडामोडीनुसार उपरकर यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. उपरकर हे नारायण राणे सिंधुदुर्गात राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीपासूनचे शिवसैनिक म्हणून प्रचलित आहेत. जिल्ह्यातील अनेक आंदोलनांमध्ये उपरकर यांनी लाठया झेलल्या आहेत. कडवट व कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. आंदोलन व प्रशासन यामधील अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. उपरकर हे ठाकरे गटात आल्यास त्यांचा तेथे मोठा मित्रपरिवार देखील आहे. ठाकरे गटात असलेल्या नेत्यांबरोबर त्यांना मात्र आता जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे उपरकर आता नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





