सिंधुदुर्गातील शस्त्र परवानाधारकांना जिल्हा प्रशासनाकडून त्रास देण्याचा प्रकार थांबवा!

अस्तित्वात नसलेले कायदे व नियम जिल्हा प्रशासनाने राबवू नये
आमदार वैभव नाईक यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून परवानाधारकांना स्थानिक यंत्रणेमार्फत सांगितले जात आहे. छाननी समितीने निश्चित केलेली शस्त्र परवाना धारकांची नावे वगळून अन्य परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याबाबतचा त्रास सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून सध्या दिला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती संरक्षण परवानाधारकांची शस्त्रे ही शेतीचे संरक्षण करण्यासाठी दिलेली असताना या शेतकऱ्यांना सध्या त्रास देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला अशी सरसकट शस्त्रे जमा करण्याचा अधिकार नसल्यामुळे नसलेले कायदे जिल्हा प्रशासनाने अमलात आणू नये असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3 हजार हुन अधिक परवानाधारकांना जिल्हा प्रशासनाकडून अशा प्रकारे शस्त्रे जमा करण्याकरिता पोलीस व पोलीस पाटील यांच्यामार्फत निरोप दिले जात आहेत. मात्र कोणत्याही प्रकारच्या नोटिसा या संबंधित परवानाधारकांना अद्याप बजावण्यात आलेल्या नाहीत. व नोटीसा न बजावतात शस्त्रे जमा करण्याचा स्वघोषित नियम जिल्हा प्रशासन रबवीत आहे. छाननी समितीच्या सूचनेनुसार शस्त्रे जमा करण्याबाबत नावे निश्चित केलेल्या व्यतिरिक्त परवानाधारकांकडून आचारसंहिता व निवडणूक च्या पार्श्वभूमीवर आपली शस्त्रे का जमा करू नये याचा खुलासा द्यावा अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत होती. मात्र या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशा नोटीस परवानाधारकांना न देता चुकीच्या पद्धतीने प्रशासन काम करत आहे. आशा प्रकारे परवानाधारकांना दिलेला त्रास खपवून घेणार नाही असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली