कोकण मराठी साहित्य परिषदेला महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर उत्कृष्ट भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर

भाषा संवर्धन पुरस्काराने उत्साह वाढला असून, अजून उत्साहाने काम करणार : नमिता कीर, केंद्रीय अध्यक्षा, कोमसाप

मराठी भाषा आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत उल्लेखनीय संस्था व व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यावर्षी संस्था प्रकारात कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे. त्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे कोकण मराठी साहित्य परिषद ही
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील लेखक, कवी, नवसाहित्यिक यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून, कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने मराठी भाषा आणि मराठी साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. याच केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकताच महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने कोकण मराठी साहित्य परिषदेला कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणामधील नवलेखक साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. त्या उद्दिष्टानुरूप कोकण मराठी साहित्य परिषदेने केंद्रीय साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलने, कार्यशाळा, स्पर्धा, पुरस्कार यासारखे लक्षणीय व उल्लेखनीय बाबी मराठी भाषा संवर्धनासाठी राबविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच कार्याची दखल महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कारसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे नाव जाहीर करण्यात आले.
कोकण मराठी साहित्य परिषद असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकतीस वर्षे सातत्याने आणि तळमळीने मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करत आहे. मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन पुरस्काराच्या रूपाने आमच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला आहे याचा आम्हांला मनस्वी आनंद झाला आहे. पुरस्काराने आमच्यावरही जबाबदारी अधिक वाढली याची जाणीव आम्हांला आहे, ती पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डाॅ.प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले. तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनीही हा पुरस्कार संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्य संवर्धनासाठी पेरलेल्या विचारांचा हा सन्मान असून मराठी भाषा आणि मराठी साहित्याचे भविष्यातही मोठ्या प्रमाणात संवर्धन व्हावे आणि प्रसार व्हावा यासाठी हा पुरस्कार आमच्यासाठी दिशादर्शक ठरणारा आहे व प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषदेला प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल साहित्य, साहित्यप्रेमी, सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

मयूर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!