‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

प्रतिनिधी । कुडाळ : कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे ‘पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन’ या विषयावर बुधवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कळसुबाई मिलेट्सच्या संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. रानभाज्या व भरडधान्याचे दैनंदिन आहारामध्ये असणारे महत्त्व, आरोग्यावर होणारे सकारात्मक बदल आणि त्यातून प्राप्त होणारी निरोगी जीवनशैली याविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी भरडधान्य महत्त्व व संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील पारंपरीक भरडधान्य यांचा उपयोग शेतकरी व इतर सामान्य जनता यांना व्हावा यासाठी श्रीम. नीलिमा जोरावर ह्या गेली पंधरा वर्षे प्रचार व प्रसार होण्यासाठी निसर्ग संवाद, शिबिरे, मिलेट व पारंपरिक अन्न महोत्सवाचे आयोजन महिला, शेतकरी यांचेसाठी करीत आहेत. या कार्यक्रमांमधून रानभाज्या व भरडधान्याचे दैनंदिन आहारामध्ये असणारे महत्त्व, आरोग्यावर होणारे सकारात्मक बदल आणि त्यातून प्राप्त होणारी निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शेती उत्पादनाच्या पारंपरिक आणि सुयोग्य पद्धती याविषयावर संवादही उपस्थित श्रोत्यांशी साधण्यात आला. भरडधान्य व पारंपरिक बियाण्याची माहिती देणारे एक प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
या निमित्ताने वसुंधरा मार्फत नेरूर येथील रानभाज्या अभ्यासक श्री. रामचंद्र शृंगारे आणि पारंपारीक बियाणे संकलक श्री. सूर्यकांत कुंभार यांचा सन्मानपत्र देऊन श्रीम. नीलिमा जोरवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई येथील वसुंधरा सल्लागार समितीचे श्री. अशोक राणे, कार्यवाह विश्वस्त श्री. सतिश नाईक आणि वसुंधराचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ५० पेक्ष जास्त शेतकरी व निसर्ग प्रेमी उपस्थित होते त्यांनी या प्रदर्शनाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!