पालक मेळाव्यातून मिळाली बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना
कुडाळमध्ये नागरी प्रकल्पांतर्फ़े आयोजन
‘मिकी माउस’ ठरले सर्वात मोठे आकर्षण
निलेश जोशी । कुडाळ : बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे ० ते ३ वयोगटातील मुलांसाठी व पालकांसाठी कुडाळ येथील तालुका स्कूलच्या प्रांगणात अलीकडेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकासासाठी मेळाव्यामध्ये खेळ कृती प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी लहान मुलांना विविध खेळांची माहिती करून देत, त्यांना खेळ खेळण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
गृहभेट व पालक सभेच्या माध्यमातून थेट निगा राखणारी व्यक्ती, पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य पर्यंत पोहोचता येते. तर पालक मेळाव्याद्वारे समुदायातील प्रत्येक घटकापर्यंत बाल विकासाचे महत्त्व आणि संदेश पोहोचू शकतो. त्यामुळेच या पालक मेळाव्यामध्ये प्रत्येक बालकासोबत खेळ कृती करण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली. बाल संगोपनाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी हा पालक मेळावा घेण्यात आला. मेळाव्यामध्ये ते ३ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे आई बंडील आणि कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले होते. त्याचबरोबर स्वेच्छेने ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे पालकही सहभागी झाले होते तसेच किशोरवयीन मुली, गर्भवती माताही उपस्थित होत्या.
कुडाळ बिटच्या पर्यवेक्षिका साधना पागी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. बालक घरामध्ये ठेवलेल्या साहित्यांसोबत जेव्हा खेळ खेळत तेव्हा तिथल्या नवीन साहित्याची त्याला।ओळख होते.तसेच खेळताना बालक विविध भूमिका निभावते त्यामुळे बालकाचा भावनिक आणि बौद्धिक विकास होतो खेळ घरातील खेळण्याद्वारे बालक जीवनामध्ये आवश्यक असलेले सर्व जीवन कौशल्य शिकू शकते. याची बालकाला पुढील आयुष्य जगताना मदत होते. समवयस्क बालकांबरोबर खेळल्यामुळे बालकाचा सामाजिक विकास सुद्धा उत्तम होतो तसेच बालक घरी सुद्धा घरातील साहित्यापासून खेळण्यासाठी प्रेरित होते आणि त्यामुळे बालकाचा सर्वांगीण विकास चांगला होतो. बालकाचा सर्वांगीण विकास विशेषतः भावनिक विकास उत्तम रीतीने घडून येण्यासाठी पालकांनी घरी आणि अंगणवाडी कार्यकर्तेने अंगणवाडीमध्ये बालकांना खेळ घरात खेळण्यास प्रोत्साहन द्यावे असे कुडाळ बीटच्या पर्यवेक्षिका श्रीमती साधना पागी यांनी सांगितले.
या मेळाव्यात सर्वात मोठे आकर्षण होते ते म्हणजे मुलांच्या लाडक्या मिकीमाऊसचे. मिकी माउसच्या संकल्पना होती ती, नाडकर्णी वाडा अंगणवाडी सेविका मानसी वर्दम.यांची. तसेच कृती प्रदर्शनीमध्ये ० ते १ वर्ष वयोगटासाठी विविध खेळ घेण्यात आले. यात झुंबर, कापडाचे किंवा कागदाचे गोळे टोपलीत किंवा बरणीत टाकणे, १ ते २ वर्षे मुलांसाठी पझल्स जोडणे, घरगुती वाद्य वाजवणे, २ ते ३ वर्ष वयोगटासाठी आकारावर लावणी, पाण्याचे खेळ खेळून बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच ० ते ३ वयोगटासाठी मुलांसाठी खेळ प्रदर्शनीमध्ये शरीरवर्धक संरक्षणात्मक आणि ऊर्जावर्धक घटक ठेवण्यात आले होते. एकंदरीतच कुडाळ बीटच्या सर्व सेविका आणि मदतनीस यांनी अत्यंत मेहनत घेऊन सदर पालक मेळावा यशस्वी केला.सामाजिक नियम ,रूढी सकारात्मकपणे बदलायला, बालसंगोपनाला अधिक पोषक वातावरणाची निर्मिती करायला पालक मेळावा हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.