विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली मध्ये शिवजन्मोत्सव २०२३ उत्साहात साजरा

कणकवली : गडकिल्ल्यांच्या अत्यंत रेखीव प्रतिकृती, पोवाडे- स्फूर्तिगीतांतून उलगडणारी शिवरायांची शौर्य कथा, हातात भगवे ध्वज घेऊन पारंपरिक वेशातील शाळकरी मुले, शिवराय- जिजाबाई- मावळे इत्यादी शिवकालीन पेहरावातील मुले अशा भारदस्त वातावरणात विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव 2023 अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका दिव्या सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पालक प्रिती काणेकर यांनी उस्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. शिवजन्मोत्सव 2023 च्या निमित्ताने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शिवनेरी, राजगड, प्रतापगड, रायगड अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. प्रत्येक किल्ल्याची इत्यंभूत माहिती विद्यार्थी देत होते. या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहताना शिवकाळात असल्याची अनुभूती येत होती. विद्यार्थ्यांनी समूहगीत व नृत्याविष्काराचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी स्फूर्तिगीते सादर करून वातावरणात स्फूर्ती आणली होती. शिवराय बालपण, व्यक्तिमत्व वैशिष्ट्य, युद्धनीती, राज्याभिषेक, प्रशासन इ. बाबत माहिती देणारी वक्तृत्व स्पर्धा देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली तसेच विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. राजश्री साळुंखे व डॉ. संदीप साळुंखे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मयुर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!