सिंधुदुर्ग महाविद्यालयात कायदेविषयक मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न

मालवण दिनांक 11 मार्च रोजी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ” महिलांविषयी कायदे” या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात संपन्न झाला. महिला दिनाच्या निमित्ताने, महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कायदेविषयक अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महिलांना रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती व्हावी या उद्देशाने दिनांक 11 मार्च ते 18 मार्च या कालावधीत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
या उद्घाटन समारंभासाठी कृ सी देसाई शिक्षण मंडळाचे संचालक आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गव्हाणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. समीर गव्हाणकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीमधील आणि इतिहासातील महिलांच्या योगदानाचा व कार्याचा गौरव पर उल्लेख केला आणि विविध विदुषी आणि कर्तृत्ववान महिलांची उदाहरणे देत, आपण त्यांच्या कार्याचे भान ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन केले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्यावतीने या अभ्यासक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच सेवांगणच्यावतीने पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांचा उल्लेख केला.
या अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉक्टर उज्वला सामंत यांनी उपस्थित सर्व रिसोर्स पर्सन्सचा परिचय करून दिला या अभ्यासक्रमाचे स्वरूप वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ॲड. सोनल बंदरकर – पालव यांनी या अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा देत अधिकाधिक विद्यार्थिनींनी व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी महिला विकास कक्षाच्या या संकल्पनेचे कौतुक करत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर, ॲड. पी. डी. देसाई, ॲड. निंबाळकर, तसेच कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सेवांगणचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर कुशे, ॲड. उर्मिला आचरेकर, ॲड. प्राची कुलकर्णी, ॲड. पूजा शेडगे, ॲड. काजल झाड, ॲड. मानसी चव्हाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उज्वला सामंत यांनी केले. महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. प्रमोद खरात यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. उज्वला सामंत, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उर्मिला मेस्त्री, प्रा. नमिता राणे, प्रा. रश्मी राऊळ , ललिता कांदळगावकर, निकिता शर्मा यांनी परिश्रम घेतले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 11 ते 18 मार्च या कालावधीत दररोज सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कायदेविषयक उपक्रमाचा लाभ मालवण आणि परिसरातील महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!