आचरा रोडवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर नगरपंचायती धडक कारवाई

कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर मच्छी विक्रेत्यांकडून रस्त्यावर खुलेआम विक्री
कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून मात्र बोटचेपी भूमिका
कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीत गेले काही दिवस सातत्याने आचरा रस्त्याने ठाण मांडून बसत असलेल्या मच्छी विक्रेत्यांवर आज कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या आदेशानुसार सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. यापूर्वी अनेकदा या मच्छी विक्रेत्यांना मच्छी मार्केट मध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापूर्वी नगरपंचायत व कलमठ ग्रामपंचायत यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली होती. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी या विक्रेत्यांना रस्त्यालगत बसण्यास मज्जाव केल्यानंतर मच्छी विक्रेत्यांनी कलमठ येथील मच्छी मार्केटमध्ये बसण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र कलमठ ग्रामपंचायत च्या कारवाईच्या भूमिकेनंतर हे विक्रेते लक्ष्मी चित्रमंदिर नजीक कणकवली हद्दीत सायंकाळच्या कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळच्या सत्रात कणकवली हद्दीत येऊन ठाण मांडून बसू लागले. याबाबत नगरपंचायतने वारंवार आदेश देऊनही मच्छी विक्रेत्यांनी नगरपंचायत चे आदेश धाब्यावर बसून पुन्हा रस्त्यालगत मच्छी विक्री सुरू केल्याने आज अचानक ही कारवाई करण्यात आली. दरम्यान कणकवली नगरपंचायत च्या कारवाईनंतर काही विक्रेते हे कलमठ हद्दीत रस्त्या लगत बसून पुन्हा मच्छी विक्री करू लागल्याने कलमठ ग्रामपंचायत कर्मचारी कारवाई करता दाखल झाले. मात्र कलमठ ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या बोटचेप्या भूमिकेने हे विक्रेते सहीसलामत पळून जाण्यात यशस्वी ठरले. अचानक केलेल्या या कारवाईने मात्र मच्छी विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ उडाली. या कारवाईत नगरपंचायत कर्मचारी रवी म्हाडेश्वर, रमेश कदम आदी सहभागी झाले होते.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली