नारायण राणे, किरण सामंत यांची कणकवलीत भेट

सिंधुदुर्ग – रत्नागिरीच्या लोकसभेच्या जागेबाबत उत्सुकता ताणली
किरण सामंत यांनी दिल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता या लोकसभेच्या जागेसाठी भाजपा कडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांची आज या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली. मात्र या भेटीत फारशी काही चर्चा झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर किरण सामंत यांनी देखील महायुतीमध्ये वरिष्ठ ठरवतील तो उमेदवार असेल असे सांगत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असतील तर त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असे महत्त्वपूर्ण विधान केल्याने आता या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी या झालेल्या भेटी प्रसंगी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिवसेनेमध्ये दावे प्रति दावे होत असताना किरण सामंत यांनी आज भेट घेत या लढती बाबत उत्सुकता अजून वाढवली आहे. त्यामुळे आता लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार त्याची उत्सुकता अजून ताणली गेली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली