बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची 32 लाख 94 हजाराची फसवणूक

संशयित सावंतवाडीतील तीन आरोपींवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल

बनावट ॲप व बनावट स्टेटमेंट द्वारे केली फसवणूक

शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे बनावट स्टेटमेंट देऊन कणकवलीतील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या पत्नी शुभांगी तायशेटे यांची 32 लाख 94 हजार 934 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे (दोन्ही शिरोडा सावंतवाडी) व प्रथमेश श्रीकांत राणे (इन्सुली सावंतवाडी) यांच्यावर कणकवली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. सूर्यकांत तायशेटे (वय 75, तेलीआळी रोड कणकवली) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. तायशेटे यांच्या दाखल फिर्यादीनुसार हा प्रकार कणकवलीतील आबु तायशेटे हॉस्पिटल येथे 19 जुलै 2022 ते 27 डिसेंबर 2023 या दरम्यान घडला. संशयित तिन्ही आरोपीनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी यांना तुम्हाला शेअर्सचा जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांना “मनी कंट्रोल ॲप” डाऊनलोड करून दिला. तसेच बनावट स्टेटमेंट देखील दिले. या बदल्यात फिर्यादी यांच्याकडून संशयीत यांनी चेक द्वारे पैसे घेतले. मात्र कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी करून दिले नाहीत. यामध्ये सूर्यकांत तायशेटे यांच्याकडून 20 लाख 19 हजार 934 व त्यांची पत्नी हिच्याकडून 12 लाख 75 हजार असे एकूण 32 लाख 94 हजार 934 एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपीच्या विरोधात भादवी कलम 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून काही जणांची अशा प्रकारे या ऍपद्वारे फसवणूक झाल्याची चर्चा आहे. यामधील कणकवलीतील व कुडाळ मधील देखील काही नावे चर्चेत आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!