सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जशासतसे उत्तर दिले जाईल – सुनिल तटकरे

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिहल्ला चढवला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मी स्वतः च उमेदवार आहे असे समजून लोकसभेला मतदान करा असे आवाहन बारामतीकरांना केले त्यावर सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघाऐवजी संसदेत बोलले पाहिजे असे वक्तव्य करून सुनेत्राताई पवार यांना लक्ष केले यावर आज सुनिल तटकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा विचार सांगणार्यांनी पतीपत्नी यांच्या नात्यात अशा स्वरुपाचे आकसपणाचे भाष्य करणे हे राजकीय संस्कृतीला अभिप्रेत नाही असे सांगितले.
आदरणीय सदानंद सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, आहे आणि उद्याही असेल पण कुण्या महिला खासदारांचे पती संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत पर्स वागवत फिरतात असे चित्र अद्यापतरी पाहिले नाही त्यामुळे सुनेत्राताई यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य हे असंस्कृत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारात बसणारे नाही असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.
आजपर्यंत अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले योगदान महाराष्ट्राला ठाऊक आहे. १९९९ पासून अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असती हे नव्याने सांगायला नको असे स्पष्ट करत सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांच्या भाषण आणि प्रचारामुळे आजपर्यंत राष्ट्रवादी अनेक आमदार, खासदार विजयी झालेले आहेत. अजित पवार यांची सभा व्हावी हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचे ध्येय असते. त्यामुळे अजित पवार हे स्वतः उमेदवार असल्याच्या भावनेतून राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करतात अशीच भावना बारामतीकरांसमोर आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात केली. यात गैर काहीच नाही पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र सुनेत्राताई यांच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त करत संकोचितपणाचे दर्शन घडवले आहे असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.
दरम्यान सुनेत्राताई पवार या उत्तम वक्त्या आहेतच शिवाय त्यांचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी काम त्यांनी उभारलेले आहे. त्यामुळे सुनेत्राताई पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी नैराश्य असले तरी असे वक्तव्य करणे थांबवावे असे सुनावत जर यापुढे अशीच वक्तव्य केली तर मात्र त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.