छत्तीसगड मधून हरवलेल्या तरुणाची महेश देसाई यांच्या प्रसंगसावधान मुळे कुटुंबीयांची भेट

जंग जंग पछाडून देखील राजकुमार कुटुंबीयांना सापडत नव्हता
जानवली येथे महेश देसाई यांची व राजकुमार याची झाली होती भेट
कणकवलीतील शहरातील कापड दुकान व्यवसायिक मालू गारमेंट चे मालक महेश देसाई यांच्या सतर्कतेमुळे छत्तीसगड मधून हरवलेल्या तरुणाची अखेर त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. श्री. देसाई नेहमीप्रमाणेच बेळणे येथील आपल्या बागेत जात असताना त्यांना एक तरुण जानवली येथे भुकेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला हाॅटेल मधे खाऊपिऊ घातले व सहज चौकशी केली असता सदर तरुण राजकुमार मरकाम, बैरामपूर छत्तीसगड येथील असल्याचे त्या तरुणाने त्यांना सांगितले. तो खूप दिवसांचा भुकेला होता. व घरातून कोणालाही न सांगता निघून आला होता. त्याच्याशी बोलत असतानाच श्री देसाई यांनी त्याच्या छत्तीसगड येथील कुटुंबीयांचा मोबाईल नंबर घेतला. व त्याच्या भावाला राजकुमार हा कणकवली येथे असल्याची माहिती दिली. राजकुमार हा घरातून निघाल्यानंतर त्याचा उत्तरप्रदेश, वाराणसी पासून अनेक भागांमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला होता. मात्र त्याचा शोध लागत नसतानाच महेश देसाई यांचा थेट त्यांच्या कुटुंबातील लोकांना फोन केल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. व महेश देसाई चे आभार मानले. व आपण येईपर्यंत राजकुमार याला आपल्या कडे ठेवून घेण्याची विनंती केली. छत्तीसगड वरुन सिंधुदुर्ग मध्ये यायला तीन दिवस लागणार होते. महेश देसाई यांनी सदर मुलाला तीन दिवस आपल्या बागेमधे ठेवले. नुकतेच राजकुमार याचे वडील व भाऊ आले व ओळख पटवून राजकुमार याला श्री देसाई यांनी त्यांच्या स्वाधीन केले. जंग जंग पछाडून देखील सापडत नसलेल्या मुलाला पाहून त्याचे वडील व भाऊ यांच्या डोळ्यांमध्ये आनंदश्रु तरळले. महेश देसाई यांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानामुळे ताटातूट झालेल्या कुटुंबातील एका सदस्याची भेट झाली. व राजकुमार हा सुखरूप आपल्या घरी गेला. महेश देसाई यांच्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली