कोणत्याही गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा – ऍड. संदेश तायशेटे

एसआरएम कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन ब्रावोलिया उपक्रम संपन्न
विविध स्पर्धातून ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
निलेश जोशी । कुडाळ : ‘ब्रावोलिया’ हा उपक्रम गेली सात वर्षे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे, हे कौतुकास्पद आहे. आपल्या देशात युवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपला देश आज वेगळ्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपण आज मोबाईलच्या दुनियेत आलो आहोत. दुनिया आपल्या खिशात आली आहे. परंतु मोबाईलचा आज वेगळ्या दिशेने वापर केला जातोय. मोबाईलमधून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्या योजनांपर्यंत आपण पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तुम्ही तुमची विचार प्रणाली बदलायला शिका. कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने बघायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन व्हीक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळचे माजी प्राचार्य ऍड. संदेश तायशेटे यांनी शनिवारी कुडाळ येथे केले. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या वतीने आयोजित ब्रावोलिया कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
बी.एम.एस. आणि बी.ए.एफ. अभ्यासक्रम तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी. तसेच त्यांनी केलेले संशोधन मांडता यावे यासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज ‘ब्रावोलिया – २०२४’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल कल्याणद समितीचे अध्यक्ष आणि व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ऍड. संदेश तायशेटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, का. आ. सामंत, सरकार्यवाह आनंद वैद्य, प्रभारी प्राचार्य ए. एन. लोखंडे, गणित विभागप्रमुख एस. के. पवार, सुरेश चव्हाण उपस्थित होते. ब्राव्होलिया २०२४ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा व बेळगाव येथील १४ महाविद्यालयातून ४७० विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ऍड. तायशेटे म्हणाले, आज काळ बदलत चालला आहे. शंभर वर्ष जगण्याचे दिवस संपले. कमी वयात आपल्याला स्वप्न गाठायचे आहे. आज आपल्या देशात युवकांसाठी अनेक संधी आहेत. आज आपल्याकडील हुशार मुलं नोकरीसाठी बाहेर जायला लागलीत. माणसाकडे पैसा असला म्हणजे तो माणूस सुखी असे होत नाही. आपण सुखी असण्यापेक्षा समाधानी असणे आवश्यक आहे. सुखी सगळेच असतात. परंतु समाधानी लोक कमी असतात. समाधान शोधताना सुखी असण्याची दिशा बघितली पाहिजे. तुमच्या यशासाठी आईवडीलांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात. त्यांना दुःखवू नका त्यांचे आशीर्वाद मिळवा. हरलो म्हणून खचून नका, असे त्यांनी सांगितले.
मनीष दळवी म्हणाले, आजचा युवा हा भारताचे भवितव्य आहे. परंतु तो युवा ज्यावेळी योग्य दृष्टीकोण, योग्य दिशा घेऊन आत्मविश्वासाने प्रवास करेल त्यावेळी खऱ्या अर्थाने भारत विकसित राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल. त्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने कॉलेज जीवनापासून होत असते. कॉलेज जीवनात आपण अशा स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून पुढे जात असतो. विद्यार्थी हे फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतात. परीक्षामध्ये चांगले गुण मिळवितात. परंतु त्यापलीकडे जगातील अनुभव घेणे आवश्यक आहे. तो अनुभव, माहिती, आत्मविश्वास आपल्याला स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून मिळतो. स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेताना मनापासून भाग घ्या. त्यामध्ये जिकंण्याची ऊर्जा ठेवा ही ऊर्जा ज्यावेळी तुमच्यामध्ये साठेल. त्यावेळी तुमचा पुढचा प्रवास सुखकर होईल. सिंधुदुर्ग जिल्हात खूप संधी आहेत. बेळगाव, सिंधुदुर्ग, गोवा या तीन जिल्ह्यात पुढच्या दहा-पंधरा वर्षात देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक येणार आहेत. त्यावेळी त्यांची बरोबरी करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील युवक पात्र असले पाहिजेत. अनेक व्यवसायाच्या संधी या जिल्ह्यात येत आहेत. त्यासाठी तुमचा सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे. प्रत्येकाने ध्येय निश्चित करायला शिका नुसत शिक्षण उपयोगाचे नाही. फक्त नोकरी पाठी लागण्यापेक्षा यशस्वी उदयोजक, चांगले मार्गदर्शक बना, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला टिकले पाहिजे. स्पर्धा परीक्षाची सुरुवात अशा परीक्षाच्या माध्यमातून होत असते. आईवडीलांचे नाव टिकवण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अशाप्रकारचे काम तुमच्याकडून होणे अपेक्षित आहे असे श्री. दळवी म्हणाले.
श्री तळेकर म्हणाले, ‘ब्रावोलिया’ हा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. ‘ब्रावोलिया’ ही संकल्पना गेली सात वर्षे या महाविद्यालयात सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जात आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ब्रावोलिया कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. आजच्या या कार्यक्रमात यात क्युझेरिया, एड मॅड शो, अपना सपना मनी मनी, ट्रेजर हंट, बेस्ट पर्सोना आणि बी.जी.एम.आय. अशा एकूण सहा उपक्रमांचा समावेशहोता. विविध महाविद्यालयांनी त्यात सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना विभागातर्फे पारितोषक देऊन गौरविण्यात आले. ब्रावोलिया हा विद्यार्थी केंद्रित उपक्रम असून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. तन्मय नातू, ओंकार नाईक, पूर्वा चव्हाण या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. उदघाटन कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.