ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

वैभववाडी : कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि सरकारच्या दर्शनिका विभागाचे माजी संपादक डॉ.अरुणचंद्र पाठक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्रद्धा कुंभोजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश भगुरे, परिषदेच्या सचिव डॉ.विद्या प्रभू व भारती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या उद्घाटन सत्रात मान्यवरांचे स्वागत, सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. यावेळी डॉ.अरुणचंद्र पाठक यांना कोकण इतिहास परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कोकण इतिहास पत्रिका या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.श्रध्दा कुंभोजकर यांनी बिजभाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात सहभागी झालेले संशोधक, प्राध्यापक, इतिहास प्रेमी व विद्यार्थी यांनी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन विभागात शोधनिबंधांचे सादरीकरण केले.
या अधिवेशनात कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखा प्रमुख श्री.प्रकाश भाऊ नारकर- (कसाल) यांनी “आम्ही सारे पाताळातील”, प्रा.श्री.एस.एन. पाटील-(आनंदीबाई रावराणे महाविद्यालय,वैभववाडी) यांनी “कुर्ली गावचे ग्रामदैवत- श्री.कुर्लादेवी मंदिर”, श्री. रणजीत हिर्लेकर-(देवगड) यांनी सन २०२२/२३ सालात सापडलेली नवीन कातळचित्रे”, श्री.प्रवीण पारकर- (मालवण) यांनी “शिवाजी महाराजांची पहिली आरमारी स्वारी मालोंड बंदरातून”, श्रीम.ज्योती बुवा-तोरस्कर-(मालवण) यांनी “सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ताराबाईचे वास्तव्य” व प्रा.सचीन दहीबावकर- (श्री.स.ह.केळकर कॉलेज,देवगड) यांनी “देवगड किल्ला” हे शोधनिबंध सादर केले. तसेच इतिहासप्रेमी व बल्लाळेश्वर देवालय या पुस्तकाचे लेखक श्री.संदीप परब सहभागी झाले होते.
तसेच सिंधुदुर्गचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक व लेखक महेश तेंडुलकर यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज” या पुस्तकाला उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या परिषदेला कोकण गोवा आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून ८३ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी वेगवेगळ्या विषयावर ७० शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या अधिवेशनाला कोकण इतिहास परिषदेचे सर्व पदाधिकारी, सभासद, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतिहास संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने नाणे प्रदर्शन व महाविद्यालय ग्रंथालयात “इतिहासावर वाचू काही” हे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब कांबळे, डॉ.सीमा केतकर, डॉ.किशोर वानखेडे व डॉ.सचिन पुराणिक यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / वैभववाडी

error: Content is protected !!