स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास जिल्यातील खेळाडू नक्कीच राज्य व देशपातळीवर चमकतील
सावंतवाडी भागात मोठया प्रमाणात टॅलेंट दडलं आहे. मात्र, त्यां खेळाडूच्या टॅलेंटला वाव मिळणे गरजेचे
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सावंतवाडी येते पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत
सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात प्रमाणात टॅलेंट दडलं आहे. मात्र, त्यांच्या टॅलेंटला म्हणावा तसा वाव मिळत नाही. एम् अकॅडमीने शालेय क्रिकेटच्या माध्यमातून केलेली सुरुवात कौतुकास्पद आहे. मात्र, या अकॅडमीतील खेळाडूंना प्रॅक्टीस व सामन्यांसाठी जिमखाना मैदान उपलब्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास येथील खेळाडू नक्कीच राज्य व देशपातळीवर चमकतील, असा आशावाद द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, येथील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी देखील सावंतवाडीत येईन अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
एम् क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित ‘द्रोणाचार्य दिनेश लाड चषक ‘ इंटर स्कूल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सावंतवाडीत आलेल्या दिनेश लाड यांनी सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एम् अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक उपस्थित होते. टी – ट्वेंटी क्रिकेट म्हणजे केवळ एंटरटेनमेंट आहे. यात गोलंदाजांचे मरण होते. खेळपट्ट्याही फलंदाजांसाठी पोषक असतात. यातून काही ठराविक खेळाडूच वनडे व कसोटी सारख्या मुख्य क्रिकेटमध्ये पुढे येतात. मात्र, आयपीएलसारख्या क्रिकेटमधून मिळणारा पैसा पाहून अनेक पालकांना आपला पाल्य क्रिकेटमध्ये जाऊन आयपीएल खेळावा असे वाटू लागले आहे. मात्र गुणवान खेळाडूंनी चांगल्या क्रिकेटलाच प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्राच्या माध्यमातून आपल्याला द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झाला. माझे गुरु रमाकांत आचरेकर यांना व मला असा दोघांनाच महाराष्ट्रातून क्रिडा क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. उदय नाईक व राजन आंगणे यांनीच मला पुरस्कारासाठी अप्लाय करण्याविषयी सुचविले होते. मला केंद्राचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असतानाही आपण प्रयत्न केलेला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार मला मिळाला नाही याची आपल्याला निश्चितच खंत आहे, असेही ते म्हणाले.
गेली अनेक वर्षे कोणतेही शुल्क न घेता मी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे. अनेक मुलांना आपण दत्तक घेतले आहे. माझ्या स्वतःच्या अकॅडमीची जागा खूप लहान असल्यामुळे मी मैदानासाठी शासनाकडे प्रयत्न केले होते. अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मला मैदान प्राप्त झाले आहे. मात्र, त्यासाठी दरमहा १ लाख ८० हजार भाडे द्यावे लागते. केवळ ८ महिन्यांसाठीच हे मैदान मला मिळाले आहे. त्यामुळे शासनाने मला हे मैदान कायमस्वरूपी व कमी भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा फायदा निश्चितच मुंबई व महाराष्ट्रातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आंबोली येथील सध्या महाराष्ट्राकडून खेळणारा प्रथमेश गावडे याला आपण आपल्या शाळेतून खेळण्यासाठी विचारणा केली होती मात्र त्याच्या पालकांना ते शक्य झाले नाही. सध्या तो महाराष्ट्राकडून खेळत असल्याचा नक्कीच आनंद आहे. मात्र अलीकडेच आपण सावंतवाडीतील टॅलेंट असलेल्या दोन खेळाडूंना दत्तक घेतले आहे. अजूनही कोणी टॅलेंट असलेला खेळाडू माझ्या संपर्कात आल्यास त्याला प्रशिक्षण देण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.