ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या 10 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली
ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली. पदयात्रेत दरवर्षी जनजागरण अभियान राबविण्यात येते, यावर्षी “विश्वशांती – वसुधैव कुटुंबकम्” हे अभियान राबवताना सर्व यात्रेकरूंकरीता आकर्षक सेल्फी पॉईंट साकारला. या सेल्फी पॉईंटवर यात्रेकरूंनी गर्दी केली होती. यावेळी विश्व शांतीसाठी यात्रेकरूंचे प्रबोधन करण्यात आले. “मनःशांती ते विश्वशांती” हे ब्रीद असलेले प्रबोधनात्मक कार्ड्सचे वाटप करण्यात आले.
या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. दरवर्षी ओल्ड गोवा येथील डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तसाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव चार दिवसाची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासुन गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंमध्ये विविध विषयांवर प्रबोधन करण्यात येते शिवाय पदयात्रेकरूंसाठी चहा, पाणी, नाश्त्याची व्यवस्था देखील केल्या जाते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्यावतीने इलियास फर्नांडिस यांनी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविण कुमार ठाकरे, बाळकृष्ण प्रभू, सॅव्हीयो डिसोझा, भार्गवराम शिरोडकर, श्रीकांत दळवी, भगवान रेडकर, अँड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते. या उपक्रमात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजचे विद्यार्थी नितीन गोंडगिरे, अनिकेत शिंदे तसेच सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅडेट ऋषिकेश रसाळ, गौतमी राऊळ, स्वप्नाली कदम, राज नाईक यांनीही सहभाग घेतला.
सावंतवाडी, प्रतिनिधी