महाआवास अभियानात कुडाळ पंचायत समितीचे तिहेरी यश

पी.एम आवास योजनेत राज्यात प्रथम, राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय
डाटा ऑपरेटर सानिका चव्हाण यांना पुरस्कार जाहीर
२३ नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
सलग दुसऱ्या वर्षी कुडाळ प.स.चे उल्लेखनीय यश
प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 चा निकाल आज जाहीर झाला. कुडाळ पंचायत समितीने या योजनेत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीत मिळालेल्या या पुरस्कारामुळे या योजनेत दुसऱ्यांदा सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 23 नोव्हेंबरला या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे
राज्यात 20 नोव्हेंबर 2023 ते दि. 31 मार्च 2024 या कालावधीत ‘महा आवास अभियान 2023-24 राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते व उप मुख्यमंत्री देवेंद फडणवीस अजित पवार ग्रामविकास व पंचायतराज तसेच इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार 23 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरीयम, जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमा दरम्यान ‘महा आवास अभियान- 2021-22 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.असे संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे
दरम्यान महाआवास अभियान 21- 22 मध्ये पंतप्रधान आवास योजना व राज्यस्तरीय पुरस्कृत आवास योजनेमध्ये कुडाळ पंचायत समिती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत राज्स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरत प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्य पुरस्कृत योजनेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. डाटा ऑपरेटर म्हणून सानिका चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा तिहेरी मुकुट कुडाळ पंचायत समितीने प्राप्त केला आहे.
राज्यात महाआवास योजना 20- 21 मध्ये सुरू झाली त्यावेळी सुद्धा कुडाळ पंचायत समितीने गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी व त्यांच्या टीमने देदिप्यमान यश मिळविले होते. यामध्ये कुडाळ पंचायत समिती कोंकण विभागात प्रथम आली होती तर कुडाळ तालुक्यातील अणाव व वाडोस ग्रामपंचायतीनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. तसेच सर्वोत्कृष्ट डाटा ऑपरेटर म्हणून स्नेहा नागदे यांची निवड झाली होती. शासन दरबारी हा मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी गौरवास्पद आहे. राज्यसरकारचे हे महाआवास योजनेचे दुसरे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षीही पुरस्कार मिळविण्यात कुडाळ पंचायत समितीने यशाचे सातत्य या निमित्ताने टिकवून ठेवले आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यात कुडाळ तालुका पंचायत समिती राज्य शासन पुरस्कारासाठी नेहमीच कार्यरत होती. तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या साडे सहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे सातत्याने ही पंचायत समिती केवळ कोकणातच नव्हे तर राज्यपातळीवर नेहमीच अव्वल राहिली. श्री चव्हाण आणि त्यांच्या टीमने या योजनेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात अनेक उपक्रम राबवले. श्री चव्हाण यांनी सातत्य ठेवल्यामुळे 31 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या कारकीर्दीत हा सलग दुसऱ्यांदा कुडाळ पंचायत समिती ही प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरावर प्रथम आणि राज्यशासनाच्या महाआवास योजनेत द्वितीय ठरली आहे.
. या अभियानात योजना विभागाचे सर्वस्वी विलास गोसावी, मृणाल कार्लेकर, नंदकुमार धामापूरकर, स्नेहा नागडे, सानिका चव्हाण, राजू खेत्री, यांनी विशेष मेहनत घेतली. पंचायत समितीने मिळविलेल्या देदिप्यमान यशा बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी तसेंच सर्व स्तरातून विजय चव्हाण यांचे व त्याच्या टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
तत्कालीन बीडीओं विजय चव्हाण यांच्यामुळे आजीला मिळाले घर
कुडाळ तालुक्यातील बांबुळी येथील 85 वर्षीय भागीरथी बांबुळकर या आजीला हक्काचे घर मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला 9 ऑगस्ट क्रांतिदिनी तिच्या डोक्यावर छत मिळाले या घराचा दिमाखात गृहप्रवेश झाला यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरले. त्यांनी केलेल्या या घराच्या पाठपुराव्याबाबत बांबुळकर कुटुंबीय गहिवरून गेले.
कुडाळ तालुक्यातील बांबुळी येथील ८५ वर्षीय भागीरथी बांबुळकर या आजी आपल्या मुलासमवेत राहतात घर बाधण्यापूर्वी त्या मातीचा ढीगारा असणाऱ्या बाजूला जी झोपडी होती त्या मध्ये राहत होत्या या आजीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत तिचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी मंजूर झाला होता ती वृद्ध असल्याने तिला जाग्यावरून उठता बसता येत नव्हते या तिच्या अडचणीमुळे तिला घर नको होते मात्र तिचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः त्यावेळचे पंचायत समिती कुडाळ तालुका गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. या आजीला हक्काचे घर मिळावे तिच्या डोक्यावर छत मिळावे या उदात्त भावनेने ग्रामपंचायत बांबुळी यांच्या सहकार्याने अवघ्या पाच महिन्यात या घराचे स्वप्न पूर्ण केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या टॅगखाली घरकुल योजना गृहप्रवेश कार्यक्रम 9 ऑगस्ट क्रांतीदिनी झाला होता.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





