आरोग्य विभागात कार्यरत 67 डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्याय
कालावधी पूर्ण होण्याआधीच कामावरून कमी करत असल्याची “यशस्वी ऍकॅडमी” कंपनीकडून नोटीस
मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार
प्रसाद गावडे यांनी स्पष्ट केली भूमिका
प्रतिनिधी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तालुका ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील मे. यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्स,पुणे कंपनीमार्फत आऊटसोर्स पद्धतीने कार्यरत 67 डाटा एन्ट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाने सेवा समाप्तीची नोटीस दिली आहे. सदर कंपनीला 3 वर्षांसाठी टेंडर मंजूर असताना प्रत्यक्षात 2 वर्ष संपण्याआधीच कंपनी व्यवस्थापन सेवा समाप्ती करून कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य संघटनेच्या शिष्टमंडळाने मनसेच्या प्रसाद गावडेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. त्या पार्श्वभूमीवर मनसे सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहणार असून जिल्ह्यात त्यांच्या जागी नव्याने उमेदवार नियुक्ती देण्याचा डाव मनसे हाणून पाडेल असा इशारा मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीद्वारे दिला आहे. त्यामध्ये कंपनी त्या ठिकाणी नवीन उमेदवार नियुक्त करण्याच्या मानसिकतेत असून कंपनी व्यवस्थापक प्रतिनिधीच्या संपर्कात असलेले काही दलाल नवीन उमेदवारांकडून मलई लाटून त्या जागी नियुक्ती देण्याची आमिषे जिल्ह्यात देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी अशा दलालांच्या अमिशांना बळी न पडू नये,आपल्याच लोकांच्या नोकरीवर गदा आणणाऱ्या अशा दलालांना प्रतिसाद देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. कंपनीच्या या जुमुलशाही विरोधात डाटा ऑपरेटर आरोग्य संघटनेला मनसेचा पाठिंबा असून जिल्हा आरोग्य विभागाने या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केल्यास मनसे आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल असा इशारा देखील गावडेंनी दिला आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ