हिंदू धर्मातील विषमता संपावी हीच स्वा. सावरकर यांना आदरांजली – शुभांगी पवार

पहिल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाला 93 वर्षे पूर्ण
अनादि मी अनंत मी सामाजिक मंचाचे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पहिले पंतप्रधान पंडित नेहरू याना अभिवादन.
‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडा पाषाण ‘ अशी आज हिंदू धर्माची गत आहे. आपल्या रत्नागिरी इथल्या मुक्कामात वि दा सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई आणि सहकारी यांनी अनेक कार्यक्रम राबवून हिंदू धर्मातील विषमता , अस्पृश्यता यांचा नाश करायची प्रयोगशाळा स्थापन केली. त्यासाठी सनातनी लोकांचा विरोध , बहिष्कार सहन केला. मात्र सावरकरांच्या पश्चात या पुरोगामी भूमिकेला कोणी पुढे चालवले नाही. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना बहुतेक देशात गावागावात मोठ्या प्रमाणावर जातीयता दिसते आहे, अशी खंत शुभांगी पवार यांनी व्यक्त केली.
१६ नोव्हेंबर १९३० साली सावरकर यांनी रत्नागिरी इथे सर्व जातींचे पहिले सहभोजन आयोजित केले. त्याला ९३ वर्षे झाली . या निमित्ताने त्या बोलत होत्या.
सावरकर रत्नागिरी इथे 1924 मध्ये स्थानबद्ध झाले आणि त्यांनी लगेच अस्पृश्यता निवारणाचे काम चालू केले. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, समुद्र बंदी, शुध्दी बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी या सात बंधनांविरुद्ध त्यांनी काम चालू केले.
त्यांनी महारवाड्यात जाऊन अस्पृश्य लोकांसोबत भजन कीर्तन करणे चालू केले. अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून भाषणे, लेख लिहिणे सुरू केले. अस्पृश्यांचा गणेशोत्सव चालू केला , त्याचा पुजारी एक भंगी समाजाचा माणूस नेमला. या गणपतीला उच्चवर्णीय सुद्धा भेट देऊन आशीर्वाद घेत असत.
त्यावेळी शाळेत, बैलगाडीत, नाट्यगृहात अनुसूचित जातीच्या लोकांना मागे बसवले जात असे. यावर त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सुधारणा केली.
सावरकरांनी शाळेत सर्व मुलांना एकत्र बसवायची चळवळ चालू केली. त्यावेळी त्याला विरोध म्हणून फोंडाघाट , कणकवली अशा काही गावात दंगे सुद्धा झाले. सर्व मुलांना एकत्र बसवायचा शाळा समितीचा आदेश रद्द करण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. तरीही कोणालाही न जुमानता त्यांनी आपले काम यशस्वी करून दाखवले. अस्पृश्य मुलांनी शाळेत जावे यासाठी त्यांना उपयुक्त साहित्य देणे त्यांनी सुरू केले.
त्यांनी वैदिक ज्ञान सर्वांना देणे सुरू केले. गायत्री मंत्र सर्वांना मोफत शिकवला. सर्व हिंदूंना वैदिक काम करायचा सारखाच हक्क असून सर्व हिंदूंना विशेषतः दलितांना जानवी देऊन ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा भेद नष्ट करायचा प्रयत्न केला.
दलितांना सुद्धा समानतेने सेवा देईल असे पहिले हॉटेल त्यांनी रत्नागिरी इथे सुरू केले. पतित पावन मंदिराची स्थापना केली.
सहभोजनाचे आयोजन करून जिथे जिथे संधी मिळेल तिथे त्यांनी सर्व जातीच्या लोकांनी समानतेने एकत्र यावे, हे सूत्र राबवले. १९२९ सालात मालवण इथे पूर्व अस्पृश्य लोकांना जानवी प्रदान करून विषमता संपवायचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी केला.
सावरकर यांच्या कार्याचा मोठा भाग म्हणजे विज्ञाननिष्ठ असणे.ते प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी विपुल लेखन केले. धर्माच्या नावाने काल्पनिक लाभाचे गाजर दाखवून सामान्य लोकांना लुटणाऱ्या दांभिक लोकांचा त्यांनी लुच्चे लफंगे अशा शब्दात निषेध केला.
आज दुर्दैवाने सावरकरांचा वारसा सांगणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादी संघटना धर्मातील विषमंता कमी करण्यासाठी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करून विज्ञानाची चळवळ फोफावण्यासाठी काही भरीव काम करताना दिसत नाहीत. या संघटना धर्माच्या गल्ल्यावर बसलेल्या लोकांच्या संघटना असून बाह्य शक्तींची भीती दाखवून हिंदू धर्मसत्तेवरील पकड घट्ट करायची हाच त्यांचा हेतू आहे. धर्मातील उच्चनीचता कमी करणे, सर्वसामान्य हिंदूंच्या समस्या सोडवणे, धर्माच्या उच्चपदी त्यांना बरोबरीची भागीदारी देणे या गोष्टी होताना दिसत नाहीत. धर्मात मोठ्या प्रमाणावर विषमता आहे, हे नाकारले जात असल्यामुळे ती संपवण्याकडे या संघटनांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.
धर्मातील विषमता नष्ट होऊन ज्या सामान्य हिंदूंनी हजारो वर्षे आपल्या परिश्रमाने, धनाने, बलिदानाने, त्यागाने हा धर्म जिवंत ठेवला आहे त्यांना सर्व स्तरावर समान भागीदारी मिळावी आणि होणाऱ्या अन्यायाबद्दल निर्भयपणे बोलता यावे , हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल .
याप्रसंगी पंडित नेहरू यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनाली राणे, भुषण मेस्त्री, ओमकार चव्हाण हे उपस्थित होते.
कणकवली(प्रतिनिधी)





