सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने घेतली महावितरणच्या  जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट

वीज ग्राहकांच्या प्रश्नांबाबत चर्चा

वीज ग्राहकांची लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार

जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांचे आश्वासन

निलेश जोशी । कुडाळ : महावितरणचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांची आज कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी भेट घेतली.
   या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणारे भारनियमन, मध्यरात्री दुपारी बंद होणारा वीजपुरवठा, बिलाबाबतच्या वीज ग्राहकांच्या तक्रारी, वाढीव बिल, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या, विद्युत पोल, शेतीपंप बंद असताना सुद्धा  आकारले जाणारे वीज बिल, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना दिली जाणारी असमानकारक उत्तरे, महावितरणच्या कस्टमर केअर विभागाकडून ग्राहक वर्गाला दिली जाणारी सेवा, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, घरे येथून जाणाऱ्या ३३ केव्ही वाहिन्या, विद्युत वाहिन्यांवर येणारी झाडीझुडपे यांची कटाई आदी प्रश्नांबाबत या भेटीदरम्यान
जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी चर्चेत आणण्यात आले.
  तसेच जिल्ह्यातील ७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मृत्यूनंतर त्यांना महावितरणकडून कोणतीही आर्थिक भरपाई न देणे तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न करणे हे मुद्दे सुद्धा या भेटीदरम्यान चर्चेत घेण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी सुद्धा जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याकडे महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला.
     महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेत यावर आपण लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांची बैठक घेऊ तसेच समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच दिवाळी सणानंतर जिल्ह्यात वीज ग्राहक मेळावे घेण्याबाबत आणि महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ग्राहकांशी कशा पद्धतीने बोलावे याचे प्रशिक्षण देण्यात यावे या मुद्द्यांवर अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
    यावेळी कुडाळचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेवक विलास कुडाळकर, नितेश महाडेश्वर, कुडाळ वीज ग्राहक संघटना अध्यक्ष गोविंद सावंत, सीए सागर तेली, द्वारकानाथ घुर्ये, जयराम डिगसकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, रोणापालचे सदाशिव गाड, सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड आदी पदाधिकारी आणि वीज ग्राहक संघटना सदस्य उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!