दादा साईल पोटात एक आणि ओठावर एक !

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांची भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांच्यावर टीकास्त्र

कुडाळ : भाजपच्या दादा साईल यांचे निलेश राणे यांच्यावरील प्रेम किती आहे ? की नाही हे कालच्या रॅलीतून दिसून आले. तुम्ही मागे का राहिला होता ? निलेश राणेंची तुम्ही दिशाभूल करीत असून त्यांना अंधारात ठेवत आहात. गणपती सणाची निलेश राणेंनी दिलेली भेट ही जनतेपर्यंत का पोहोचली नाही असा कडक सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांना केला आहे.
दादा साईल तुम्ही वैभव नाईक यांच्यावर टीका करता. परंतु, तुम्ही जे धंदे करता किंवा निलेश राणे यांच्या नावावर जी कामे घेता ती टक्केवारीवर दिली जातात. त्यातून आलेली पैशांची माया गोळा करून गाड्या घेतलात, ड्रायव्हर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सोशल मीडिया ऑपरेटर यांना पगार कशातून देता ? कॉन्ट्रॅक्टरकडून मिळालेल्या टक्केवारीतून मिळालेल्या पैशाच्या मायेतून देत आहात असा आरोपही राजन नाईक यांनी दादा साईल यांच्यावर लगावला आहे.
आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःचा इतिहास बघा आपण कुठे काय करतो ते सांभाळा, अशीही टीका केली.
निलेश राणेंना तुम्ही अंधारात ठेवलात याचा अभ्यास निलेश राणेंनी करावा. दादा साईल पोटात एक आणि ओठावर एक हे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात दिसून आले. राणेनी ज्यावेळी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दोघाच भाजप नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र तुम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून पदाचा त्याग का नाही केला ? निलेश राणेंना दाखविता की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मात्र, तुम्ही मनात निलेश राणेंबाबत प्रेम नाही. त्यामुळे तुम्ही वैभव नाईक यांच्यावरील टीका थांबवा, अन्यथा तुमचा इतिहास समोर आणू असा इशारा सुद्धा राजन नाईक यांनी दादा साईल यांना दिला.
विशाल परब यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावता; त्यांचे वाढदिवस साजरे करता. मात्र, निलेश राणे यांचे स्वागत बॅनर लावले नाहीत, अशी टीकाही राजन नाईक यांनी केली.
तर आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे.

ब्युरो न्यूज । कुडाळ

error: Content is protected !!