कातकरी व्यक्तींना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी पाच वनकर्मचारी निर्दोष

संशयितांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
वनखात्याच्या राखीव जंगलामध्ये औषधे गोळा करण्यासाठी गेलेल्या कातकरी या अनुसुचित जातीच्या सहा व्यक्तींना संगनमताने जंगलात व कार्यालयात दांड्याने मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून पाच वन कर्मचाऱ्यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्र. १ तथा विशेष न्यायाधीश सानिका जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५ वा. च्या सुमारास ही घटना घडली होती. फोंडाघाट वनकार्यालयाचे कर्मचारी शशिकांत साटम, संदीपकुमार कुंभार, सत्यवान कुबल, सुभाष बडदे, मश्चिंद्र दराडे यांनी वनखात्याच्या फोंडाघाट येथील जंगलात औषधांसाठी फिरत असलेल्या फिर्यादी सखू पवार, बारक्या पवार, राजन पवार, संदीप पवार, दत्ताराम निकम व अनिल निकम यांना फायबर दांड्याने मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना कार्यालयात आणून तेथेही मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली होती. तसेच वनखात्यातर्फे फिर्यादीसह इतर साथीदारांवर खैर झाड तोडल्याचा आरोप करून त्यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत कणकवली पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून वन कर्मचाऱ्यांवर भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ सह अनुसुचित जाती जमाती अत्या. प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), आर आणि ३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास काम उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी केले होते.
सुनावणीत सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरूद्ध कोणताही सबळ पुरावा न आल्याने तसेच साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी