ज्ञानाचे अदान – प्रदान ही आधुनिक युगाची गरज- युवराज महालिंगे

कणकवली/मयुर ठाकूर
“ज्ञान, माहिती आणि कल्पनांचे अदान- प्रदान करणे व त्या अनुषंगाने सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमात योगदान देणे ही एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात काळाची गरज आहे. त्या पद्धतीने आपण पुढे गेलेच पाहिजे; नाहीतर काळाच्या ओघात आपण मागे पडतो याचे भान विद्यार्थी व प्राध्यापकांना हवे” असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख युवराज महालिंगे यांनी केले. कणकवली कॉलेज, कणकवली आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कणकवली महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विद्याशाखेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या ‘फॅकल्टी अँड स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम ‘ उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते तर यावेळी फोंडाघाट कला व आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे, कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.सोमनाथ कदम उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ.बालाजी सुरवसे यांनी प्रास्तविकपर भुमिका मांडली. “देशाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार धोरणानुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार केवळ आपल्याच महाविद्यालयाच्या अध्यापकाकडून अध्यापन न होता परिसरातील संबंधित विषयाच्या महाविद्यालयाशी सामंजस्य करार करणे व त्यातून विद्यार्थी प्राध्यापक यांचे विचार , युक्त्या, कल्पना व अध्यापन व ज्ञानाची देवाण घेवाण करणे हा महत्त्वाचा उद्देश ठेवला आहे. या पुढील काळात कणकवली महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विद्यार्थी वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सोमनाथ कदम यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आधुनिक काळात आंतरविद्याशाखीय विचार प्रणालीला महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य व समन्वय प्रस्थापित करण्यासाठी असे उपक्रम मौलिक ठरतात.,”
असे मत डॉ.सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सतीश कामत यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन दर्पे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव डफळे यांनी केले.
प्रा. कु.कीर्ती पाटील, प्रा. एम.पी. चव्हाण तसेच कणकवली महाविद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.