घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कणकवलीत गडगडाटासह पाऊस

तालुक्यातील हळवी भात शेती धोक्यात
काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उभे भातपीक जमीनदोस्त
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कणकवली तालुक्यात विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून तालुक्यातील बहुतांशी भागात जोरदार गडगडाट व विजा चमकू लागल्या. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे हळवे भात पीक हाती येण्याच्या तोंडावर पावसाने नुकसान केले. काही ठिकाणी उभे असलेले भात पीक आडवे होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. तसेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पाऊस झाल्याने त्या पुढील नऊ दिवस पाऊस सुरू राहण्याची अटकळ देखील बांधली जात आहे. हा परतीचा पाऊस असा सुरू राहिला तर हाता तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यात हळवी भात शेती कापणी योग्य झाली असून, अनेक ठिकाणी भात पिकाची कापणी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र या कापणीच्या तोंडावर सायंकाळच्या सत्रात गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज अधिकच जोर केल्याने त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भर पडणार आहे. दरम्यान विजांच्या लखलखाटामुळे नुकसान झालेल्या ची अजून पर्यंत महसूल दप्तरी नोंद नाही.
दिगंबर वालावलकर, कणकवली