कुडाळ नगरपंचायतची धडक कारवाई: अखेर शहरातील ६ मालमत्ता सील

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतमध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर कुडाळ नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या कर विभागाकडून १० हजाराहून अधिकच कर थकविणान्या २०० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी कर न भरल्यास मालमत्ता जप्त करणार असल्याच्या आशयाच्या नोटीसा संबंधित थकबाकीदारांना देण्यात आल्या होत्या. थकीत मालमत्ता सील करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने जप्तीपथक तयार करण्यात आल्या आहेत. आज कुडाळ शहरातील ३ अपार्टमेंटमधील वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या सहा मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक व जप्तीपथक प्रमुख सहा कर निरीक्षक रचना कोरगांवकर, लिपिक दत्ताराम म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी शैलेश नेवाळकर, केतन पवार, मंदार सावत, रोहित परब, सतीश जाधव प्रवीण कोरगावकर यांच्या पथकाने केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून मालमत्ता व पाणीपट्टी कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांकडे जाऊन तो कर भरून घेण्यासाठी वसुलीपथक तयार असून हे फिरते पथक थकबाकीदारापर्यंत पोहचून त्यांच्याकडून करवसुली करून घेत आहेत. कुडाळ नगरपंचायतीमार्फत कर जमा करण्यासाठी नगरपंचातीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ता कर व पाणी पट्टी कर थकबाकी ठेवलेल्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिर करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेळेत थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या कर विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ
