कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत: चाकरमान्यांचे प्रचंड हाल!

कोकण रेल्वे मार्गावर कळंबोली जवळ मालगाडीचे डबे घसरल्याने कालपासून कोकण रेल्वे प्रवासी हैराण
काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले
दिगंबर वालावलकर/ कणकवली
काल पनवेल जवळ कळंबोली या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर मालगाड्यांचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक कालपासून पूर्णतः विस्कळीत झाली. यात काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. अजूनही कोकण रेल्वे मार्ग वरील रेल्वेची वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोकणात येणाऱ्या व कोकणातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच गाड्या विस्कळीत झाल्याने चाकरमानी संतप्त झाले असून दिवा स्थानकावर देखील आज सकाळी रेल रोको करण्यात आला. तर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी सर्व स्थानकात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच सिंधुदुर्गात सुरू झालेल्या पावसाने चाकरमान्यांची पूरती दमछाक झाली.