आचरा रोडवर पिसेकामते येथे अपघातात एक जण जागीच ठार

महिला गंभीर जखमी

कणकवली पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

कणकवली : कणकवलीहून आचरा रोडने मसुरेकडे मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल आणि समोरून येणारी कार यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार कृष्णा अच्यूत मसुरकर (55, मसुरे-कावावाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या मागे मोटरसायकलवर बसलेली त्यांची मेहुणी वैभवी विजय तोडणकर (47,रा.मुंबई) ही गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी 6 ते 6.30 वा.च्या सुमारास कणकवली-आचरा मार्गावर पिसेकामते-कदमवाडी येथे घडला.
अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेवून जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात हलविले. कणकवली पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, हवालदार श्री. देसाई, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गंभीर जखमी वैभवी तोडणकर यांच्यावर कणकवली उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. कृष्णा मसुरकर हे त्यांच्या मेहुणीला घेवून कणकवली रेल्वेस्टेशनवर आले होते. त्यांचे सासरे आणि मेहुणी गुरूवारी मुंबईला जाणार होते. त्यांचे तिकीट मुंबईहून कणकवलीत पाठविण्यात आले होते. ते घेण्यासाठी दोघे आले होते. या अपघात प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!