कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वर्षभरातील चार अपघाती मृत्यू महावितरणकडील मुजोर अधिकाऱ्यांच्या अनास्थेचे “बळी”

वर्षभराच्या कालावधीत नऊ गंभीर अपघातानंतर देखील विद्युत निरीक्षक विभाग निद्रिस्त का?
निर्ढावलेले महावितरणचे अधिकारी व बेजबाबदार ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीचे कारनामे ‘प्रकाशगड” दरबारी उघड करणार
प्रसाद गावडे यांचा इशारा
प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये जिल्ह्यात आउटसोर्स पद्धतीने जवळपास ४५० हून अधिक कंत्राटी कर्मचारी अक्षरशः जीवावर उदार होवून काम करत आहेत. हॅल्मेट, सेफ्टी बेल्ट,चांगल्या दर्जाचे हँग्लोज आदि संरक्षक साहित्य त्यांना ठेकेदाराकडून तर नाहीच पण महावितरणकडून पुरविले जात नाही. ठेकेदाराने ६० दिवसांचे ट्रेनिंग देवूनच कर्मचाऱ्यांना विद्युत भारावरची कुशल कामे देणे नियमाधीन असताना जिल्ह्यात मात्र ट्रेनिंग साठीचे पैसे जिरवले जात आहेत. यामुळेच मागील वर्षभरात जिल्ह्यात नऊ गंभीर अपघात होवून त्यात चार कर्मचारी प्राणांस मुकले गेले आहेत. जिल्ह्यात विद्युत निरीक्षक विभाग‘ बिनकामाचा’ ठरल्याने या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला आपल्या बेजबाबदारपणामुळे दैनंदिन अपघात घडत आहेत याचे साधे सोयर सुतक उरलेले नसून ते फक्त कर्मचाऱ्यांच्या जीवावर “ मलई ” खाण्यात गुंतले आहेत. कर्मचारी विमा योजना,भविष्य निर्वाह निधीसाठीचे कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे राजरोसपणे लाटले जात असून पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होवून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील वाऱ्यावर सोडले आहे हे खरे दुःख आहे.
गणेशोत्सवावानंतर अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीचे कारनामे ‘प्रकाशगड’ दरबारी महाव्यवस्थापकांकडे मांडणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम करणार आहे असे श्री गावडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. गावडे म्हणतात, विद्युत निरीक्षकांनी सर्व अपघातांमध्ये महावितरण व ठेकेदार यांना सम प्रमाणात दोषी ठरवले आहेत, मग चार तरुणांचा जीव जावून देखील त्यांच्यावर आयपीसी कलम ३०४-अ नुसार गुन्हे दाखल का झाले नाहीत? महावितरणचे भ्रष्ट अधिकारी स्वत:च्या मर्जीतील ठेकेदार निवडण्यासाठी मागील तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया न करताच फक्त दरपत्रकाच्या आधारे मर्जीतील ठेकेदाराकरवी संगनमताने “भ्रष्टाचार” करत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणवणारे नुसते फोटोबाजी करत असून त्यांनीही कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. म्हणूनच नऊ अपघातांपैकी एक अपवाद वगळता अन्य एकाही प्रकरणामध्ये प्रत्यक्षात नुकसान भरपाई अदा झालेली नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत “कुंपणच शेत खात आहे” अशी परिस्थिती असून महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या डोक्यात खऱ्या अर्थाने “उजेड” पाडण्याची आवश्यकता आहे अशी परखड टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. महावितरणच्या कार्यपध्दतीवर गंभीर आरोप करत कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे
गणेशोत्सवावानंतर अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीचे कारनामे ‘प्रकाशगड’ दरबारी महाव्यवस्थापकांकडे मांडणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम करणार आहे असे श्री गावडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.