हरकुळ खुर्द येथे नदीलगत संरक्षण भिंत उभारा

ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
हरकुळ खुर्द येथील नंदिनी नदीचे पाणी भात शेती व नजीकच्या घर परिसरामध्ये घुसून ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदीलगत संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी हरकुळ खुर्द मोहुळ वाडी ग्रामस्थांमधून केली जात आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे, जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्यामध्ये हरकुळ मोहूळ या भागामध्ये लोकांची भात शेती पाण्याखाली राहिली. तसेच काही घरांमध्ये नंदिनी नदीचे पाणी गेले. यात नागरिकांचे नुकसान झाले. पुढील काळात पुन्हा अतिवृष्टी झाली तर नंदिनी नदी व त्याला जोडणारा दारवण ओहोळाचे पाणी पुन्हा मोहूळ परिसरात भरण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी या नदीलगत संरक्षण भिंत मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली प्रतिनिधी