मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध

कणकवलीतील मराठा समाज बांधवांनी दिले पोलिसांना निवेदन
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठा समाज विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेत आहे.
यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तरीही मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून कोणतीही ठाम भूमिका व निर्णय झालेला नसल्याने समाजामध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन चालू असतात. जालना जिल्यातील “अंतरवाली सराटी” या गावामध्ये गेले अनेक दिवस शांततेमध्ये आंदोलन सुरु होते. सदर आंदोलकांवर शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस यंत्रणेमार्फत लाठीचार्ज करण्यात आला, त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा आम्ही कणकवली तालुक्यातील समस्त मराठा समाज निषेध व्यक्त करतो. तसेच शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेल्या या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत.
त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा नाही तर या प्रकाराची पुनरावृत्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होऊ शकते. त्याला सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा अपवाद राहणार नाही, याची दखल घ्यावी, असे निवेदन मराठा समाजाच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळी मनोज राव राने यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी